दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोन युवकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

चितारओळीकडून भरधाव आणि झिकझॅक दुचाकी चालविणाऱ्या युवकामुळे हा अपघात घडला. अपघातात तो युवकही किरकोळ जखमी झाला. मात्र, अपघातातील दोन्ही युवकांची परिस्थिती पाहता दुचाकीस्वाराने लगेच दुचाकीसह पळ काढला.

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील भावसार चौकात दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या. या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचे डोके दुभाजकावर आपटून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका युवक गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. हा अपघात आज मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाला. अभिजीत भूपेंद्र जंगम (वय 21,रा. लष्करीबाग) आणि मोहम्मद जुबैर मोहम्मद साबिर (वय 20, रा. मोमीनपुरा) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर शिवम राजू वाघमारे (वय 22,लष्करीबाग) असे जखमी युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत हा अन्य दोन मित्र जुबैर आणि शिवम यांच्यासोबत आज मंगळवारी दुपारी दोन वाजता एकाच दुचाकीवर (एमएच 49-एएन1093) ट्रिपल सीट जात होते. अभिजीत हा दुचाकी चालवित होता. भावसार चौकातून दुचाकीने भरधाव जात होते. दरम्यान चितारओळीकडून एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्याने ट्रिपलसीट जात असलेल्या अभिजीतच्या सरळ अंगावर घातली. अपघात वाचविण्यासाठी अभिजीतने करकचून ब्रेक दाबले. दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्या. हा अपघात एवढा गंभीर होता की, अभिजीत आणि जुबैर या दोघांचे डोके डिव्हायडरवर आदळले तर शिवम हा रस्त्याच्या कडेला फेकला गेल्या. अभिजीत आणि जुबैरचे डोके फुटल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवम गंभीर जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धावाधाव केली. जखमी शिवमला लगेच रूग्णालयात पोहचले तर अभीजित आणि जुबैरचे मृतदेह पोलिसांनी मेयोत रवाना केले. या प्रकरणी शिवमच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. 

ट्रॅफिक जाम आणि तणाव 
सीए रोडवर अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी झाली. दोन युवक जागीच ठार झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले. अपघातातनंतर जवळपास तासभर वाहतूक विस्कळित झाली होती. रस्त्यावर काहीतरी अनर्थ होण्यापूर्वीच कोतवाली पोलिस पोहचले. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवित नागरिकांना शांत केले. 

कुत्र्याचे पिल्लूही ठार 
शिवम हा श्‍वान विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला आज एका ग्राहकाला लॅब्राडॉर जातीचे गोंडस पिल्लू नेऊन द्यायचे होते. टेलिफोन एक्‍सचेंज चौकातून शिवमने गाडीवर बसल्यानंतर कुत्र्याचे पिल्लू मांडीवर घेतले होते. मात्र, अपघातात त्या पिल्ल्याचाही मृत्यू झाला. 

वाहतूक पोलिस वसुलीत मग्न 
अभिजीत, शिवम आणि जुबैर हे तिघेही दुचाकीने ट्रिपलसिट जात होते. तसेच दुचाकी चालविणाऱ्या युवकाच्या डोक्‍यात हेल्मेटही नव्हते. एरव्ही चौकाचौकात हेल्मेट कारवाईचा बडगा उचलणारे वाहतूक पोलिस "वसुली'त मग्न होते की काय? असा प्रश्‍न विचारला जात आहे. कारवाईच्या नावावर वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी जर कारवाईकडे लक्ष दिले असते तर हा अपघात घडला नसता. चितारओळीकडून भरधाव आणि झिकझॅक दुचाकी चालविणाऱ्या युवकामुळे हा अपघात घडला. अपघातात तो युवकही किरकोळ जखमी झाला. मात्र, अपघातातील दोन्ही युवकांची परिस्थिती पाहता दुचाकीस्वाराने लगेच दुचाकीसह पळ काढला. त्या युवकाचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, accident, death of two youths