दिलासा ! भरतवन बचावले, महामेट्रोची माघार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

भरतवनमधील रस्ता रद्द झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास रोखला जाणार आहे. महापौर संदीप जोशी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे शहरातील वन बचावणार आहे. महापालिकेनेही महामेट्रोला झाडांच्या पुनर्रोपणाची परवानगी दिली नाही, हेही उत्तमच झाले. 
- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणप्रेमी व संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन. 

नागपूर : पर्यावरणप्रेमींचे आंदोलन, महापौर संदीप जोशी यांनी केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर महामेट्रोने आज महापालिकेला भरतवनमधून प्रस्तावित रस्ता करणार नसल्याचे पत्र दिले. त्यामुळे भरतवनमधील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनाही मोठा दिलासा मिळाला आहे. 

फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ऍप्रोच रस्ता म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. हा प्रस्तावित मार्ग भारतवन परिसरातून तयार केला जाणार होता. त्यासाठी वन परिसरातील हजारावर झाडांची कत्तल केली जाणार असल्याने शहरातील पर्यावरणप्रेमींना या रस्त्याला तीव्र विरोध करीत आंदोलन केले होते. दरम्यान, महामेट्रोने या परिसरातील झाडे काढून दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्याची कार्यवाही सुरू केली होती. महापालिकेलाही त्यांनी पुनर्रोपणाची परवानगी मागितली होती. महामेट्रोचे पुनर्रोपणाचे पत्र अद्यापही महापालिकेकडे आहे. दरम्यान, महापौर संदीप जोशी यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला. त्यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांच्याकडून भारतवनमधील प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची परवानगी घेतली. महामेट्रोनेही आता फुटाळा चौपाटीचा रस्ता बंद करण्याची गरज नसल्याचे तसेच भरतवनमधील प्रस्तावित रस्ता तयार करणार नसल्याचे पत्र महापालिकेला दिले. त्यामुळे आता भारतवनमधील शेकडो झाडे वाचणार आहेत. या प्रस्तावित मार्गावर दीडशेवर झाडे शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टळली असून पर्यावरणप्रेमींत आनंद व्यक्त केला जात आहे. 

जैवविविधतेला जीवदान 
भरतवनच्या अधिवासात जवळपास 120 प्रजातींचे पक्षी आणि 22 मोरांचे वास्तव्य आहे. महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारामुळे झाडे तर वाचणार आहेच, शिवाय विविध प्रजातींचे पक्षी व मोरही येथे कायम राहतील. त्यामुळे एकप्रकारे जैवविविधतेला जीवदान मिळाले. 

चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, bharatvan, mahametro, nmc, trees