नागपूर ब्रेकिंग : धंतोलीत आढळला कोरोनाबाधित, एकाच दिवशी 56

Nagpur big breaking : Dhantoli, Bajajnagar Restricted Area
Nagpur big breaking : Dhantoli, Bajajnagar Restricted Area

नागपूर : धंतोली येथेही आज कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. धंतोलीसह बजाजनगर, गांधीबाग कापड मार्केट परिसरातही कोरोनाबाधिताचे निदान झाले. त्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धंतोली, बजाजनगर व गांधीबाग कापड मार्केट परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. धंतोली येथील एका कुटुंबीयांकडे मुंबईवरून त्यांच्या मुलाचा मित्र आला. त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. आज तपासणी अहवालातून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

त्यामुळे महापालिकेने धंतोली परिसरातील नागरिकांना बाहेर जाण्यास तसेच बाहेरील नागरिकांना परिसरात प्रतिबंध लावण्यासाठी प्रमुख रस्ते बंद केले. लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग 16 येथील बजाजनगर परिसरातही कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे बजाजनगर परिसरातील उत्तर-पश्‍चिमेस उत्कर्ष विशाखा अपार्टमेंट, उत्तरेस उत्कर्ष अपार्टमेंट ते गोल्हर यांचे घरापर्यंतचा रस्ता, उत्तर पूर्वेस गोल्हर यांचे घर, पूर्वेस रजनी नशिने यांचे घरापासून ते प्लॉट क्रमांक 125 ते प्लॉट क्रमांक 150, सागर किराणा स्टोर्सपर्यंत, दक्षिण-पश्‍चिमेस ज्ञानेश्‍वर मंदिर परिसर नागरिकांसाठी बंद करण्यात आला.

एकीकडे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात येत असतानाच शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातशेपर्यंत येऊन ठेपली आहे. शुक्रवारी शहरातील विविध लॅबमध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यातून 56 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळल्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याने आरोग्य यंत्रणेसह सामान्य नागरिकांतही खळबळ उडाली आहे.

शहरात कोरोनाबाधितांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज शहरातील नाईक तलाव येथील 33 जणांसह एकूण 56 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. गेल्या काही दिवसांत नाईक तलाव परिसर कोरोनाबाधितांचा नवा "हॉटस्पॉट' ठरला आहे. मोमिनपुरा येथील 13, टिमकी येथील 2, हिंगणा रोड, लकडगंज, सेमीनगरी हिल येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून अमरावती, गोंदिया, मध्य प्रदेशातील सागर तसेच अमरावती मार्गावरील बाजारगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. शहरातील मेयोतून 43, एम्समधून 10, मेडिकलमधून 2 तर एका खासगी लॅबमधून एक, असे 56 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले.

एका दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आल्याची पहिलीच घटना आहे. यापूर्वी शहरात एका दिवशी 44 रुग्ण आढळून आले होते. 29 मे रोजी 43 रुग्ण आढळून आले. आजच्या तपासणी अहवालाने मागील विक्रम मोडीत काढला. या 56 जणांसह कोरोनाबाधितांची संख्या 682 पर्यंत पोहोचली. सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येने महापालिका, आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.

गेल्या काही दिवसांत शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली. यातील काही जण कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाले. आज धंतोलीतही मुंबईवरून एका कुटुंबाकडे मुलाचा मित्र आला. तो कोरोनाबाधित निघाल्याने धंतोली परिसरात सायंकाळी खळबळ माजली. महापालिकेने हा परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

सात दिवसांत 181 रुग्णांची भर

29 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या 501 झाली होती. एकाच आठवड्यात 181 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. आज आलेल्या अहवालामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मात्र, उद्याने, मैदाने सुरू झाल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com