पदवी विकायला काढलेल्या बेरोजगाराची चित्तरकथा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

मासिक वेतनावर तीन हजारांची नोकरी स्वीकारली. तीन वर्षे शैक्षणिक सेवा दिल्यानंतरही संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्याच्या जागी डोनेशन घेऊन दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली.

नागपूर : हाती पदवी असताना पैसे खर्च केल्याशिवाय कोणी नोकरी देत नसल्याने निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने आपली पदवीच चक्क विकायला काढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील केकेझरी गावातील तरुण जगन्नाथ गायकांबळे याने सोशल मीडियावरून आपली पदवी कोणीतरी विकत घ्यावी, असे आवाहन केले आहे.

शेती करून कर्जबाजारी झालेल्या आई-वडिलांना कर्ज व सावकाराच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी जगन्नाथने शिक्षणाचा ध्यास घेतला. त्याकरिता लहानपणीच गाव सोडले. पार्टटाइम नोकरी करून चंद्रपूर शहरात पदवी घेतली. नागपूरला पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर बी. एड अभ्यासक्रम पूर्ण केला. केव्हा तरी आपल्या शिक्षणाची कदर केली जाईल, चांगली नोकरी मिळेल या आशेने त्यांनी मासिक वेतनावर तीन हजारांची नोकरी स्वीकारली. तीन वर्षे शैक्षणिक सेवा दिल्यानंतरही संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्याच्या जागी डोनेशन घेऊन दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली.

नाराज झालेल्या जगन्नाथने व्यवसाय करण्यासाठी नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. स्टार्टअप, स्टॅंडअप इंडिया' योजनेच्या माध्यमातून लघुद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळावे, यासाठी बॅंकांकडे अर्ज केला. मात्र, व्यवस्थापकाने "हमीदार' पाहिजे, असे सांगून अनेक खेटा मारायला लावल्या. शेवटी कर्जही दिले नाही. कुठेच यश मिळत नसल्याने पोटापाण्यासाठी त्याने एका कंपनीत रात्रपाळीत सुरक्षारक्षकाची नोकरी स्वीकारली आहे.

मात्र, जगन्नाथने नोकरीची जिद्द अजूनही सोडली नसून तो दिवसभर अभ्यास करतो. मात्र, त्याची आशा मावळत चाचली आहे. पदव्यांचे काहीच काम नसल्याने त्याने त्या विक्रीला काढल्या आहेत.
 

पदवी विकून व्यवसाय करणार

शिक्षकासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता पास आहे. तरी नोकरी मिळत नाही. लघुद्योग सुरू करण्यासाठी बॅंक कर्ज देत नाही. उच्चशिक्षित असूनही बॅंक विश्‍वास ठेवत नाही. त्यामुळे मी बी.ए., एम.ए., बीएडची पदवी विकायला काढली आहे. त्यातून येणाऱ्या रकमेतून व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे.
-जगन्नाथ माधव गायकांबळे, उच्चशिक्षित तरुण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur chandrapur sakal degree selling for money