जन्माला येताच चिमुकलीला व्हावे लागले कोरोनाबाधित आईपासून वेगळे... वाचा ही करुण कहानी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

प्रसूतीची वेळ येईपर्यंत अहवाल प्राप्त झाला नव्हता. यामुळे मेयोतील वरिष्ठ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनात निवासी डॉक्‍टरांनी महिलेला टेबलवर घेण्याची सूचना केली. दुर्दैवाने बुधवारी सकाळी सातला ही गर्भवती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि सारेच डॉक्‍टर हादरले. मात्र, या वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य लक्षात घेत मेयोतील स्त्री व प्रसूतीरोग विभागातील निवासी डॉक्‍टरांनी आव्हान स्वीकारत प्रसूती टेबवर या महिलेला घेतले. 7 वाजून 45 मिनिटांनी या महिलेनं मुलीला जन्म दिला.

नागपूर : मेयोच्या डॉक्‍टरांनी देवदूत बनून कोरोनाबाधित गर्भवती मातेची प्रसूती केली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नऊ महिने पोटात वाढवलेल्या काळजाचा तुकडा जन्मतःच रडला, त्यावेळी त्या मातेचे डोळे पाणावले. या महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉक्‍टरांना विलगीकरणात ठेवण्यात आले. विलगीकरणात जाणार, हे माहिती असूनही त्या निवासी डॉक्‍टरांनी ही प्रसूती केली. त्या निवासी डॉक्‍टरांना सलाम. 

ही महिला मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. मंगळवार, 28 एप्रिल रोजी दुपारी साडेअकरा वाजता प्रसूतीसाठी मेयोत दाखल झाली. मोमिनपुरा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने या गर्भवती मातेची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, प्रसूतीची वेळ येईपर्यंत अहवाल प्राप्त झाला नव्हता. यामुळे मेयोतील वरिष्ठ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनात निवासी डॉक्‍टरांनी महिलेला टेबलवर घेण्याची सूचना केली. दुर्दैवाने बुधवारी सकाळी सातला ही गर्भवती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि सारेच डॉक्‍टर हादरले. मात्र, या वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य लक्षात घेत मेयोतील स्त्री व प्रसूतीरोग विभागातील निवासी डॉक्‍टरांनी आव्हान स्वीकारत प्रसूती टेबवर या महिलेला घेतले. 7 वाजून 45 मिनिटांनी या महिलेनं मुलीला जन्म दिला.

कोरोनाबाधित मातेने दिला चिमुकलीला जन्म 
मुलीचे वजन 2 किलो आहे. आई आणि तिची लेक दोघीही ठणठणीत आहेत. मेयोच्या प्रसूतीरोग विभागाच्या शस्त्रक्रियागारात बाधित महिलेच्या प्रसूतीदरम्यान डॉक्‍टरांनी पीपीई किटसह सर्व काळजी घेतली. प्रसूतीनंतर प्रसूती वॉर्डासह शस्त्रक्रियागार व येथील सर्व कक्ष निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर मातेला कोरोनाबाधितांच्या महिला वॉर्डातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले. त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. 

कधी घेता येईल तान्हुलीला कुशीत? 
त्या मातेने मुलीला जन्म दिला. रडण्याचा आवाज ऐकला. मात्र, प्रसूतीनंतर दुरूनच त्या चिमुकलीला पाहता आलं. मात्र, कुशीत घेता आलं नाही. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर मायलेकींची ताटातूट झाली. या चिमुकलीला दुसऱ्या बालरोग वॉर्डात ठेवण्यात आलं आहे. ती माता मुलीला कुशीत घेण्यासाठी आतुर होती. तिचा जीव कासाविस होत होता. मात्र, मेयोतील सूत्रानुसार 48 तास दूर ठेवण्यात येईल. बालरोग विभागाच्या सूचनेनुसार ठरविण्यात येईल. 

आता तरी थांबावे हे व्यसन, खर्‍यामुळे हे गाव बनले आहे ’हॉटस्पॉट’ 
 

प्रसूत माता कोरोनाबाधित असल्याने चिमुकलीला आईपासून दूर ठेवण्यात आले. आईच्या दुधातून बाळाला कोरोनाची लागण होत नाही. मात्र, आईच्या श्‍वासातून संसर्गाची भीती आहे. अशावेळी जोखीम स्वीकारली नाही. आईने मुलीला जन्मानंतर डोळे भरून बघितले. मात्र, कोरोनाबाधित असल्याने मुलीला मातेजवळ देता येत नाही. प्रसूती करणाऱ्या डॉक्‍टरांच्या पथकाचे हे यश आहे. 
- डॉ. प्रशांत उईके, विभागप्रमुख, स्त्री व प्रसूतीरोगशास्त्र, मेयो 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur corona affected pregnant women delievery