कोरोनातून सावरलेल्या नागपूरच्या या व्यक्तीने केले 'प्लाझ्मा'दान...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020

शहरात मार्चमध्ये खामला येथील संतोष तोतवानी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात 14 दिवस उपचार करण्यात आले. यातून ते 14 एप्रिलला पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. मात्र, त्यांना पुन्हा 14 दिवस घरी थांबण्याचा सल्ला मेयोतील डॉक्‍टरांनी दिला होता. आता ते पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी लक्ष्मीनगर येथील जीवनज्योती ब्लड बॅंकेत 'प्लाझ्मा'दान केले.

नागपूर : कोरोनाग्रस्तांवर यशस्वी उपचार व्हावे, या हेतूने कोरोनातून पूर्णपणे सावरल्यानंतर खामला येथील संतोष तोतवानी यांनी 'प्लाझ्मा'दान केले. ते नागपुरातील पहिले 'प्लाझ्मा' दानवीर ठरले. पूर्णपणे बरे झालेऱ्या रुग्णाने 'प्लाझ्मा'दान केल्याची नागपुरातील ही पहिलीच घटना असून प्लाझ्मा थेरेपीने कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने पहिले पाऊल टाकले आहे.
 
शहरात मार्चमध्ये खामला येथील संतोष तोतवानी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात 14 दिवस उपचार करण्यात आले. यातून ते 14 एप्रिलला पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. मात्र, त्यांना पुन्हा 14 दिवस घरी थांबण्याचा सल्ला मेयोतील डॉक्‍टरांनी दिला होता. आता ते पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी लक्ष्मीनगर येथील जीवनज्योती ब्लड बॅंकेत 'प्लाझ्मा'दान केले. मात्र तत्पूर्वी पूर्ण वैद्यकीय तपासणी तसेच प्रक्रिया यासाठी पार पाडण्यात आली.

दहा दिवसांपूर्वी मेडिकल येथील डॉक्‍टरांनी त्यांना फोन करून 'प्लाझ्मा'दान करण्याबाबत विचारणा केली होती. तोतवानी यांनी लगेच डॉक्‍टरांना होकार कळवला. डॉक्‍टरांनी त्यांना रक्त तपासणीसाठी बोलावले. त्यांचे रक्तांचा नमुणे घेण्यात आले. गेल्या दहा दिवसांत मेडिकलमध्ये त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात ते सुदृढ असून त्यांचा प्लाझ्मा इतर कोरोनाग्रस्तांना दिल्यास तेही तत्काळ बरे होऊ शकतात, अशी खात्री झाल्यानंतर मेडिकलमधील डॉक्‍टरांनी त्यांना 'प्लाझ्मा'दानची प्रक्रिया शनिवारी  पार पडणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दुपारी बारा वाजता संतोष तोतवानी लक्ष्मीनगरातील जीवनज्योती ब्लड बॅंकेत पोहोचले. येथे डॉक्‍टरांच्या उपस्थितीत त्यांनी 'प्लाझ्मा'दान करीत नागपुरातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात सुवर्ण अध्याय जोडला. या प्लाझ्माच्या विविध तपासणीनंतर त्याच्या गुणधर्माशी समरूप अत्यवस्थ करोना बाधित रुग्णात त्याचे प्रत्यारोपण केले जाईल.

अवश्य वाचा- नागपूरच्या ग्रामीण भागातही कोरोना पसरवत आहे पाय... येथे आढळली महिला पॉझिटिव्ह
 
लवकरच प्लाझ्मा बॅंक

'आयसीएमआर'ने देशातील केवळ 21 वैद्यकीय महाविद्यालयांना 'प्लाझ्मा थेरेपी'साठी परवानगी दिली आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई व ठाणेचा समावेश आहे. दान करण्यात आलेल्या प्लाझ्माची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बाधितात त्याचे प्रत्यारोपण केले जाईल. याप्रकल्पांतर्गत मेडिकलमध्ये लवकरच प्लाझ्मा बॅंकही तयार होणार आहे.
 
काय आहे प्लाझ्मा थेरेपी ?

कोरोनातून सावरलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी यशस्वीपण लढणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. या ऍन्टीबॉडीज कोरोनाग्रस्ताच्या शरीरात सोडल्यास त्याच्या शरीरात कोरोनाशी लढण्याची क्षमता निर्माण होते. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जात आहे. यापूर्वीही राज्यात अनेकांनी प्लाझ्मा दान केल्याची घटना घडल्या.

करोनामुक्त झालेला व्यक्ती प्लाझ्मा दान करून करोना योद्धा म्हणून समाजासाठी मोठी भूमिका पार पाडू शकते. मेडिकलला करोनामुक्त व्यक्तीकडून पहिले प्लाझ्मा दान झाले. त्याच्याशी समरूप कोरोनाबाधित मिळताच त्यात प्लाझ्मा प्रत्यारोपण केले जाईल. या प्रकल्पासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याकडून प्रचंड मेहनत घेतली जात आहे.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

दहा दिवसांपूर्वी मेडिकलमधील डॉक्‍टरांचा फोन आला. त्यांनी प्लाझ्मा दानाबाबत विचारणा केली. मी तत्काळ होकार दिला. त्यांनी रक्त घेतल्यानंतर तपासणी केली. काल, शुक्रवारी त्यांचा पुन्हा फोन आला. त्यांनी आज, शनिवारी लक्ष्मीनगरातील ब्लड बॅंकेत जाण्यास सांगितले. दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत प्लाझ्मा दानची प्रक्रिया पार पडली.
- संतोष तोतवानी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur corona negative person donated plasma