नागपूरकरांचा प्रवास सुखकर, हिंगणा मार्गावरील मेट्रोला हिरवी झेंडी

nagpur metro
nagpur metro

नागपूर : राज्य सरकारचे काही प्रकल्प केंद्र सरकारकडे अडकले असतील तर त्याला गतीने परवानगी द्यावी. केंद्र व राज्याने हातात हात घालून काम केल्यास महाराष्ट्रात विकासाची मेट्रो वेगाने धावणार, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. आज एका गाडीत बसू शकलो नाही, परंतु एका स्टेशनवर नक्कीच एकत्र आलो, आता विकासाची साथ सोडणार नाही, असे त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून सांगितले.

हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या लोकार्पणाचा समारंभ सुभाषनगर येथील मेट्रो स्टेशनवर पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीसिंग पुरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तर केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी यांनी मेट्रोला प्रत्यक्ष हिरवी झेंडी दाखवून पुढल्या स्टेशनसाठी रवाना केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार प्रकाश गजभिये, आमदार समीर मेघे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव डी. एस. मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते. जनहिताच्या प्रकल्पात कधीही राज्य सरकारकडून अडवणूक होणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कामठी, बुटीबोरी, हिंगणापर्यंतच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकार तत्काळ परवानगी देईल. राज्याचा विकास करताना उपराजधानी नागपूरसह इतरही शहरांना मागे पडू देणार नाही. विकास करताना शहरात उद्योगधंदेही आवश्‍यक आहे. त्यासाठी वाहतुकीचे जाळे आवश्‍यक असून नागपूर, मुंबईसह इतर शहरांतही ते पसरविण्यास प्राधान्य देणार आहे. प्रत्येक शहराची ओळख, संस्कृती कायम ठेवून विकास साधणार आहे.

भ्रष्टाचार बनतोय शिष्टाचार; महसूल अव्वल, खाकीचेही एक पाऊल पुढे

माझी मेट्रोचे आज लोकार्पण झाले, यापुढे आता स्वच्छता व निगा राखण्याची जबाबदारी नागरिकांची असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रोच्या कामात प्रत्यक्ष लक्ष घातले, त्यामुळे ते अप्रतिमच असणार, अशी पावतीही त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची जी कामे सुरू केली, त्याचा वेग कायम सुरू राहील, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी केले तर आभार महामेट्रोचे संचालक सुनील माथूर यांनी मानले.

विकासासाठी तिन्ही मंत्र्यांच्या पाठीशी : गडकरी
राज्याच्या मंत्रिमंडळात डॉ. नितीन राऊत, अनिल देशमुख, सुनील केदार नागपूरचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नागपूरच्या विकासासाठी या तिन्ही मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी यांनी ब्रॉडगेज मेट्रो तसेच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील जुजबी बाबीसाठी प्रकल्प राज्य सरकारकडे मंजुरीसाठी आहे. त्याला लवकर नगरविकासमंत्री, मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ब्रॉडगेज मेट्रो गडचिरोलीपर्यंत : एकनाथ शिंदे
ब्रॉडगेज मेट्रोसाठी स्वतः लक्ष घालणार अशी ग्वाही देत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मेट्रो गडचिरोलीपर्यंत जायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली. केंद्राच्या मदतीने या मेट्रोचे काम केले जाईल. मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले. फडणवीस याच्या पाठिंब्यामुळे समृद्धी मार्गाचे काम 20 टक्के पूर्ण झाले असून तेही काम वेळेत पूर्ण होईल. समृद्धी मार्गही मेट्रोप्रमाणे नागपूरकरांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

डिसेंबरपर्यंत माझी मेट्रोचे काम पूर्ण होणार : पुरी
पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये नागपूर मेट्रोचा पाया रचला. नागपूर वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहरातील 38 किमीपैकी 24 किमी मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्यावर मेट्रो धावत आहे. डिसेंबरपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होईल व संपूर्ण नागपूरकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार असल्याचे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषणातून सांगितले. सध्या देशात 680 किमी मेट्रोचे जाळे असून त्यावर मेट्रो धावत असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com