नागपुरात नगरसेवक घरीच विलगीकरणात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

नागपुरात प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ हाेत असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी शहरातील आणखी काही भाग सील केले आहेत. यामुळे या भागातील नगरसेवकही घरीच क्वारंटाईन झाले आहेत.

नागपूर : शहरातील नवनवीन भागांमध्ये कोरोनाबाधित आढळून येत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय करण्यात येत आहे. वाठोडा येथील गोपालकृष्णनगरात एक जण कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे नगरसेवक बंटी कुकडे यांना घरीच विलगीकरणात राहावे लागत आहे. या परिसरासह आज तांडापेठ, न्यू इंदोरा भागातील वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले.

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग 20 मधील तांडापेठेतील दक्षिण-पश्‍चिमेस केशव पौनिकर यांचे घर, दक्षिण-पूर्वेस बापू बन्सोड चौक, उत्तर पूर्वेस धनराज सायकल स्टोर्स, उत्तरेस गणेश नंदनवार यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस हनुमान मंदिर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज काढले.

वाचा- नागपुरात गृहमंत्र्यांच्या घराजवळ लुटले होते 18 लाख, पोलिसांनी असे केले जेरबंद

याशिवाय नेहरूनगर झोनमधील प्रभाग 26 वाठोडा येथील गोपालकृष्णनगरातील उत्तर पूर्वेस शीतला माता मंदिर, दक्षिण-पूर्वेस मोरेश्‍वर कळसे यांचे घर, दक्षिण-पश्‍चिमेस मुरलीधर निमजे यांचे घर, पश्‍चिमेस केशव ठाकरे यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस गणपत येरणे यांचे घरापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले. आशीनगर झोनअंतर्गत प्रभाग सातमधील न्यू इंदोरा परिसरातील दक्षिणेस अमोल चंद्रिकपुरे यांचे घर, दक्षिण पूर्वेस ताराबाई गेडाम, उत्तर पूर्वेस नमो बुद्धविहार, उत्तरेस सुनील चामटे यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस संकल्प बुद्ध विहार, पश्‍चिमेस मुरली ट्यूशन क्‍लासेस, दक्षिण-पश्‍चिमेस विजय पाटील यांचे घरापर्यंतचा भाग प्रतिबंधित करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur municipal carporator Qurantined