महापालिका अभियंत्यांचा कोरोनामुळे मृत्यू, फ्रंट लाइन वर्करच वाऱ्यावर; खासगी रुग्णालयांनी धुडकावले

nagpur municipal corporation employee died due to corona
nagpur municipal corporation employee died due to corona

नागपूर : महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमधील ४६ वर्षीय अभियंता नितीन रामटेके यांचा आज पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला. रामटेके यांना खासगी रुग्णालयांनी बेड नाकारल्यानंतर मेडिकलमध्ये बेड मिळाला अन् उपचारही सुरू झाले. परंतु, विलंब झाल्याने कोरोनाने फास घट्ट केला. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात असून महापालिकेच्या फ्रंट लाईन वर्करसाठी प्रशासनाने उपचारासाठी वेगळी सुविधा निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे. 

अभियंता नितीन रामटेके यांनी सोमवारी सीटी स्कॅन केले. त्यात त्यांना कोरोनाचे निदान झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने महापालिकेतील त्यांचे सहकारी व मित्रांनी त्यांना घेऊन खासगी रुग्णालय गाठले. परंतु, तीन खासगी रुग्णालयांतही त्यांच्यासाठी बेड उपलब्ध झाले नाही. अखेर सहकाऱ्यांनी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार विकास ठाकरे, आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मेडिकलचे अधिष्ठातांना फोन केला. रामटेके यांच्यासाठी मेडिकलमध्ये बेड उपलब्ध झाले. त्यांच्यावर सोमवारी रात्री दीड वाजतापासून उपचार सुरू झाले. मेडिकलमधील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयांनाही नाकारल्यामुळे भीती व संताप दोन्ही व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांत रामटेके यांच्या मृत्यूसाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा आहे. महापालिकेने फ्रंट लाईन वर्करसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह वेगळ्या रुग्णालयाची सुविधा करून द्यावी, अशी मागणी काही अधिकाऱ्यांनी केली. 

कामाच्या ताणामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष -
नितीन रामटेके गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण पथकासोबत कारवाईत भाग घेत होते. त्यामुळे त्यांना नेहमीच दुकानांच्या गर्दीत जावे लागत होते. अतिक्रमण कारवाईत भाग घेण्याच्या दडपणामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त जबाबदाऱ्या, नागरिकांशी संपर्क यातूनच अनेक अधिकारी प्रकृतीकडेही लक्ष देऊ शकत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

पत्नीलाही घेता आले नाही अंत्यदर्शन - 
रामटेके यांच्या पत्नीही कोरोनाबाधित असून मुलींनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीला तसेच मुलींनाही त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. त्यांच्या अंत्य संस्काराला केवळ भाऊ व बहिणी उपस्थित होत्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यावरच ही वेळ आल्याने प्रशासनाबाबत संताप वाढत आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com