मुंढे इफेक्‍ट! साडेनऊच्या ठोक्‍याला कर्मचारी हजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

तुकाराम मुंढे शिस्तीचे पक्के आहेत. थोडाही कामचुकारपणा ते खपवून घेत नाही. रुजू झाले तेव्हापासूनच त्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी देणे सुरू केले. काहींना निलंबित केले.

नागपूर : केंव्हाही यावे आणि वाटेल तेव्हा जावे या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वृत्तीत तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर आता बदल झाला आहे. यापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती सरासरी साठ टक्के असायची. त्यात आश्‍चर्यकारक फरक पडला आहे. आता उपस्थिती चक्क शंभर टक्के झाली आहे. 

तुकाराम मुंढे शिस्तीचे पक्के आहेत. थोडाही कामचुकारपणा ते खपवून घेत नाही. रुजू झाले तेव्हापासूनच त्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी देणे सुरू केले. काहींना निलंबित केले. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. कार्यालयात फॉर्मल ड्रेस, क्‍लिन शेव्ह घालून येणे बंधनकारक केले आहे. जीन्स पॅंट व टी शर्ट घालून येण्यास बंदी घातली आहे. जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमांनाही येणे बंधनकारक केले आहे. जीन्स घालून आलेल्या कर्मचाऱ्यांना माझ्याकडेही महागडे जीन्स आहे असे सांगून त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती. कपडे घालायची हौस बाहेर भागवा, मात्र कार्यालयातून येताना फॉर्मल ड्रेसच घाला. तुमचे समाजातील स्टेट्‌स जीन्स घातली म्हणून नाही तर महापालिकेचे कर्मचारी म्हणून असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. 

मुंढे यांनी 28 जानेवारीला सूत्रे स्वीकारली. त्यापूर्वी 23 जानेवारीपर्यंत मनपा मुख्यालयात विविध विभागात उशिरा येणारे आणि अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरासरी 41 टक्के होती. आता सरासरी 96 टक्के झाली आहे. बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून हजेरी लावावी. याचा सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर झाल्याचे सध्या असलेल्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य (दवाखाने), ग्रंथालय, समाजकल्याण, कर आकारणी विभाग, जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के होती. शिक्षण, प्रकाश, स्थावर, उद्यान, आरोग्य (स्वच्छता), एलबीटी, लोककर्म, स्लम, नगररचना या विभागामध्ये 95 ते 99 टक्के उपस्थिती आहे. अन्य विभागातीलही कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती 90 टक्‍क्‍यांच्यावर असून सरासरी 96 टक्के इतकी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, tukaram mundhe, commissioner, nmc, employee on time