ऍकेडमिक कॅलेंडरचे नियोजन चुकणार, विद्यापीठासमोर येणार या अडचणी... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, प्रत्येक विद्यापीठाला वर्षभराच्या कामकाजाचे नियोजन करावे लागते. यामध्ये दोन्ही सत्राची सुरुवात, परीक्षा आणि दीक्षान्त समारंभाच्या संभावित तारखांचा समावेश असतो.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दोन दिवसांपूर्वी ऍकेडमिक कॅलेंडर संकेतस्थळावर टाकण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव बघता, खरोखरच ऍकेडमिक कॅलेंडरनुसार कामकाज होणार आहे का? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कॅलेंडरचे नियोजन फसत असल्याचे निदर्शनास येते. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, प्रत्येक विद्यापीठाला वर्षभराच्या कामकाजाचे नियोजन करावे लागते. यामध्ये दोन्ही सत्राची सुरुवात, परीक्षा आणि दीक्षान्त समारंभाच्या संभावित तारखांचा समावेश असतो. यानुसार विद्यापीठाकडून दरवर्षी ऍकेडमिक कॅलेंडर संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून विद्यापीठाद्वारे सातत्याने कॅलेंडर तयार करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक वर्षी कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखांबाबतचे नियोजन फसत असल्याचे दिसून येते. 

अधिक माहितीसाठी - साडेतीन लाख द्या, अन्यथा व्हिडीओ करतो व्हायरल... विद्यार्थ्यांनी दिली विवाहितेला धमकी
 

गेल्या वर्षीच्या ऍकेडमिक कॅलेंडरनुसार 1 ऑगस्टला पहिले सत्र (1, 3, 5, 7) सुरू होईल. 24 डिसेंबरला हे सत्र संपणार असून, दुसरे सत्र (2, 4, 6, 8) सुरू होईल. हे सत्र 25 मे 2021 पर्यंत चालेल. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, आता परीक्षांबाबत ठरले नसल्याने विविध अभ्यासक्रमांचे निकाल कसे घोषित करणार याबाबत संभ्रमावस्था असल्याने पुढील प्रवेश कोणत्या आधारावर होईल हे कळायला मार्ग नाही. 

देशभरात कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. सध्या त्याबाबत आदेश नसला तरी, खुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत शुक्रवारी (ता.19) घोषणा केली. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नोव्हेंबर महिन्यापासून परीक्षा घेणे शक्‍य होईल का? हे सांगता येणे कठीण आहे. 

दीक्षान्त समारंभाचा विषय केल्यास गेल्यावर्षी दीक्षान्त समारंभ डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरले होते. मात्र, सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या तारखा न मिळाल्याने जानेवारी महिन्यात दीक्षान्त समारंभ घेण्याचे ठरले. त्यामुळे कोरोनामुळे यावेळी वेळेत दीक्षान्त समारंभ घेता येईल का? हा प्रश्‍न आहे. 

 
परिस्थितीनुसार होतात बदल 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार ऍकेडमिक कॅलेंडर तयार करण्यात येते. मात्र, कुलगुरूंना वेळोवेळी त्यात बदल करण्याचे अधिकार आहे. आलेल्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होत असतात. 
-डॉ. नीरज खटी, प्रभारी कुलसचिव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University Academic calendar planning will be missed