ऐकावे ते नवलच! उन्हाळी परीक्षेचा डेटाच गुल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

विद्यापीठाच्या परीक्षेच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज अपलोड करण्यात येतात. या डाटाच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिल्या जातात. मात्र, विद्यापीठाकडून तांत्रिक चूक झाल्याने हा डाटा अचानक उडाल्याचे समजते. त्यामुळे परीक्षा वेळेत घेण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी भरलेला परीक्षा अर्ज, त्यासाठी पैसे भरलेली पावतीची झेरॉक्‍स मागविली आहे. त्याबाबत बऱ्याच महाविद्यालयातील बाबूंनी विद्यार्थ्यांच्या अर्जांसह पैशाच्या पावत्यांचीही शोधाशोध सुरू केली आहे. मात्र, डाटा वेळेत न मिळाल्यास उन्हाळी परीक्षेत मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यात सुरुवात होणार आहे. मात्र, या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा डाटा परीक्षा विभागातून उडाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐन परीक्षेच्या वेळी डाटा उडाल्याने परीक्षा विभागाकडून जवळपास 503 महाविद्यालयांना पत्र पाठवून पुन्हा नव्याने डाटा मागविला असल्याची माहिती आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात. यामध्ये जवळपास 1200 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परीक्षेसाठी नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा येथील जवळपास 3 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी अर्ज करतात. साधारणत: जून महिन्याच्या शेवटपर्यंत परीक्षा सुरू असतात. दरवर्षी यासाठी महाविद्यालयांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्या जातात. याशिवाय मागील सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या पेपरसाठीही हजारो विद्यार्थी अर्ज करीत असतात. जवळपास पहिल्या दोन टप्प्यांतील या परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. यासाठी विद्यापीठाच्या परीक्षेच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज अपलोड करण्यात येतात. या डाटाच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिल्या जातात. मात्र, विद्यापीठाकडून तांत्रिक चूक झाल्याने हा डाटा अचानक उडाल्याचे समजते. त्यामुळे परीक्षा वेळेत घेण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी भरलेला परीक्षा अर्ज, त्यासाठी पैसे भरलेली पावतीची झेरॉक्‍स मागविली आहे. त्याबाबत बऱ्याच महाविद्यालयातील बाबूंनी विद्यार्थ्यांच्या अर्जांसह पैशाच्या पावत्यांचीही शोधाशोध सुरू केली आहे. मात्र, डाटा वेळेत न मिळाल्यास उन्हाळी परीक्षेत मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, यासंदर्भात परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केवळ तांत्रिक समस्या असून सर्व डाटा सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, नेमकी कोणती तांत्रिक चूक झाली, ज्यामुळे सर्व डाटा मागविण्यात येत आहे हे कळायला मार्ग नाही.

विद्यार्थ्यांचे होणार नुकसान
पदवीधर महासंघाचे अध्यक्ष व माजी व्यवस्थापन परिषदेचे संचालक महेंद्र निंबार्ते यांनी यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निंबार्ते यांनी केली आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांचा डाटा महाविद्यालयांकडे नाही, त्याबाबत परीक्षा विभागाकडून काय करण्यात येईल, असाही प्रश्‍न उपस्थित केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur university : Summer examination's data vanished