अस्सल खर्रा, तर्री पोह्याची चव चाखायचीय्‌ तर या मग...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

दोन महिन्यांपूर्वी शहरातील प्रत्येक चौकातील तर्री पोह्याच्या टपरीवर सकाळी अन्‌ काही भागात सायंकाळीही खवय्यांची रांग दिसून येत होती. परंतु लॉकडाऊमुळे अनेकांनी या काळात घरी तर्री पोह्यावर ताव मारला. परंतु टपरीचे पोहे ते पोहेच, असेच अनेकांचे मत झाले.

नागपूर  :  प्लेटमधील गरम पोहे, त्यावर स्वादिष्ट मसाल्यांचा गंध असलेला लाल रंगाचा रस्सा, त्यावर टमाटरचा काप, या चौकातील टपरीवरील तर्री पोह्यासाठी प्रत्येकाचीच जीभ आसुसली आहे. घरातील पोह्यांना टपरीवरील पोह्याची सर येत नसल्याने अनेक खवय्यांचे लक्ष दररोज चौकातून जाताना तर्रीच्या गंधाने दरवळणाऱ्या टपरीकडे जाते. या निराश झालेल्या खवय्यांना सोमवारपासून तर्री पोह्याची चव चाखायला मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात "चोरी चोरी' मिळणारा खर्राही "खुल्लम खुल्ला' मिळण्याची शक्‍यता आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरातील प्रत्येक चौकातील तर्री पोह्याच्या टपरीवर सकाळी अन्‌ काही भागात सायंकाळीही खवय्यांची रांग दिसून येत होती. परंतु लॉकडाऊमुळे अनेकांनी या काळात घरी तर्री पोह्यावर ताव मारला. परंतु टपरीचे पोहे ते पोहेच, असेच अनेकांचे मत झाले. सरकार कधी एकदा लॉकडाऊन मागे घेतात अन्‌ तर्री पोह्याची चव घेता येईल, अशी अवस्था खवय्यांची झाली आहे. तर्री पोह्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांना 1 जूनपासून टपरीवरील तर्री पोहा अन्‌ चहा मिळण्याची शक्‍यता आहे.

दवाखान्यातून घरी परतणाऱ्या डॉक्‍टरवरच केला त्यांनी जीवघेणा हल्ला!

एक जूनपासून लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा सरकार विचार करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आता कोरोनासोबतच जगणे क्रमप्राप्त असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलतेचा विचार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकाची "शान' असलेले तर्री पोहे आता खवय्यापासून अधिक लांब नसल्याचे चित्र आहे. देशात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

परंतु ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तेथेच लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजते. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांना दिलासा मिळणार नाही. परंतु, यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी नागपूरला रेड झोनमधून वगळले होते. ही नागपूरकरांसाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी, पोलिसांतही एक जूनपासून शहरात लॉकडाऊन शिथिल होण्याची चर्चा आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करून शहरातील इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली.

 

खमंग सुगंधाची प्रतीक्षा

खमंग सुगंध दरवळणाऱ्या मोठ्या गंजातून घेतलेली लाल तर्री दुकानदार कपाळापर्यंत हात वर करून पुन्हा खाली आणून ग्राहकाला प्लेट सुपूर्द करीत होता. हे दृश्‍य अन्‌ पाचशे मीटर अंतरापर्यंत येणारा खमंग सुगंध तर्री पोहा न खाणाऱ्यांनाही सुखावत होता. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून तर्री पोहे बंद असल्याने खवैय्यांची मोठी आफत झाली आहे.

टपरी व्यावसायिकांबाबत सरकार अनुकूल

शहरात टपरी उघडून चहा, तर्री पोहे विक्री करून उदरनिर्वाह करणारा मोठा समुदाय आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या समुदायाचा व्यवसाय बुडाला असून, अनेकांकडील होते नव्हते खर्च झाले. मटण, चिकन विक्रेत्यांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच या टपरीचालकांना दिलासा देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpuri Kharra, Tarri Poha will be available from Monday