esakal | 25 वर्षांपूर्वी नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवला होता व्हीसीएवर थरार  ! वाचा काय घडले 

बोलून बातमी शोधा

file photo

शेवटच्या दिवशी 329 धावांचे लक्ष्य निश्‍चितच सोपे नव्हते. विदर्भाकडे गंधे व दोशींसारखे दर्जेदार फिरकीपटू असल्याने राजस्थानला विजयासाठी संघर्ष करावा लागेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. क्षणाक्षणाला सामन्याचे पारडे इकडून तिकडे झुकत होते.

25 वर्षांपूर्वी नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवला होता व्हीसीएवर थरार  ! वाचा काय घडले 
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : रणजी क्रिकेटमध्ये बहुतांश सामने एकतर्फी कंटाळवाण्या स्थितीत अनिर्णीत राहतात. पण, काहीवेळा क्रिकेटप्रेमींना शेवटच्या क्षणापर्यंतचा रोमांचही अनुभवायला मिळतो. असाच काहीसा थरार 25 वर्षांपूर्वी नागपूरकरांना व्हीसीए मैदानावर पाहायला मिळाला होता. अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या त्या लढतीत राजस्थानने यजमान विदर्भावर अवघ्या एका गड्याने थरारक विजय मिळवून खेळाडूंसह प्रेक्षकांनाही कायमच्या जखमा दिल्या. निकालाने विदर्भाचे समर्थक निराश अवश्‍य झाले. परंतु, रोमांचक सामना पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. 


वनडे किंवा टी-20 सामन्याची आठवण करून देणारा तो चारदिवसीय सामना जानेवारी 1995 मध्ये विदर्भाचे कर्णधार प्रवीण हिंगणीकर आणि राजस्थानचे राजीव राठोड यांच्या संघांमध्ये खेळला गेला. विदर्भ संघात हिंगणीकरशिवाय उमाकांत फाटे, सदाशिव अय्यर, परिमल हेडाऊ, योगेश घारे, प्रीतम व उल्हास हे गंधे बंधू, सुधीर वानखेडे, मनीष दोशी, रचित भल्ला, ओवेस तालिबसारखे अनुभवी व नव्या दमाचे खेळाडू होते. तर, राजस्थान संघात कसोटीपटू प्रवीण आमरे, गगन खोडा, राहुल कांवत, ए. के. सिन्हा, विलास जोशी, पी. के. कृष्णकुमार, अनिल परमार, मनीष सिंग, एम. इस्लाम व डी. पी. सिंगसारख्याचा समावेश होता. विदर्भाने सलामीवीर अय्यर (88 धावा) व घारेंच्या (65 धावा) अर्धशतकांच्या बळावर पहिल्या डावात 235 धावा केल्या. राजस्थानकडून कृष्णकुमार यांनी सहा व अस्लम यांनी तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव अवघ्या 189 धावांत आटोपला. प्रीतम गंधे व दोशी यांनी प्रत्येकी चार गडी बाद करून विदर्भाला 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. विदर्भाने दुसरा डाव 8 बाद 282 धावांवर घोषित करून राजस्थानपुढे विजयासाठी 329 धावांचे लक्ष्य ठेवले. विदर्भाच्या दुसऱ्या डावात फाटे यांचे 84 व हेडाऊ यांचे 69 धावांचे बहुमूल्य योगदान ठरले. शिवाय हिंगणीकर यांनी 33 व प्रीतम यांनी 25 धावा काढल्या. राजस्थानकडून कृष्णकुमार यांनी पुन्हा पाच गडी बाद करून विजयाची पायाभरणी केली. 

रणजी सामन्यात कुणी लावली विदर्भाची नाव तिरावर! वाचा

कृष्णकुमार पडले विदर्भावर भारी 


शेवटच्या दिवशी 329 धावांचे लक्ष्य निश्‍चितच सोपे नव्हते. विदर्भाकडे गंधे व दोशींसारखे दर्जेदार फिरकीपटू असल्याने राजस्थानला विजयासाठी संघर्ष करावा लागेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. क्षणाक्षणाला सामन्याचे पारडे इकडून तिकडे झुकत होते. अखेर कृष्णकुमार विदर्भावर भारी पडले. सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या कृष्णकुमार यांनी जोरदार फटकेबाजी करत सामन्याचे चित्रच बदलवून टाकले. त्यांनी केलेल्या नाबाद 106 धावांमुळे राजस्थानने ती रोमांचक लढत एका गड्याने जिंकून विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले. तळातील अस्लम (22 धावा) व डी. पी. सिंग (नाबाद 20 धावा) यांनीही अष्टपैलू कृष्णकुमार यांना उत्तम साथ दिली. सामन्याचे हिरो ठरलेल्या कृष्णकुमार यांनी संकटाच्या वेळी नाबाद शतक तर झळकावलेच, शिवाय सामन्यात अकरा विकेट्‌सही घेतल्या.