कोरोनाच्या नागपूर पॅटर्नची देशभर चर्चा... ही आहे विशेषता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

केंद्र सरकारच्या पथकाने विविध शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात केलेल्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांना सक्तीने विलगीकरणात पाठविण्यात आले. संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात आले. यातून अनेकांची माहिती पुढे आली. त्यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांनाही विलगीकरणात पाठविण्यात आले. 

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी ती इतर शहराच्या तुलनेत कमी आहे. कोरोनाबाधित आढळल्यानंतर तत्काळ त्या परिसरातील नागरिकांना विलगीकरणात पाठवून त्यांना कोरोनापासून लांब ठेवण्याचा नागपूर पॅटर्न केंद्रीय अधिकाऱ्यांनाही आवडला. केंद्रीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभर हा पॅटर्न लागू करण्याबाबत इतर शहराच्या महापालिकांनाही सूचना केल्या आहेत. 

शहरात गेल्या तीन दिवसांत दोनशेपर्यंत कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. आतापर्यंत शहरात 928 कोरोनाबाधित आढळून आले. नागपूरच्या तुलनेत लहान असलेल्या शहरांमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला. त्या तुलनेत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचा दावा अनेकदा प्रशासनाने केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्याबाबत केलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांची दखल कोरोनासंबंधी केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकानेही घेतली. 

काल, केंद्र सरकारच्या पथकाने विविध शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात केलेल्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांना सक्तीने विलगीकरणात पाठविण्यात आले. संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात आले. यातून अनेकांची माहिती पुढे आली. त्यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांनाही विलगीकरणात पाठविण्यात आले. 

तुकाराम मुंढेंच्या ट्विटरवर आदित्य ठाकरेंची कमेंट, नागनदीबाबत म्हणाले..

विलगीकरणात पाठविताना नागरिकांचा विरोधही अधिकाऱ्यांना सहन करावा लागला. मात्र, आयुक्तांनी सक्ती केली. परिणामी शहराचा कोरोनाबाधितांचा आलेख अनेक दिवस खाली होता. एकूणच केलेल्या प्रयत्नांची माहिती आयुक्तांनी केंद्रीय पथकाला दिली. केंद्रीय पथकाने आयुक्तांच्या प्रयत्नांचे कौतुक करीत कोरोनाबाधितांवर नियंत्रणाचा नागपूर पॅटर्न इतर शहरांनीही आत्मसात करावा, अशा सूचना दिल्या, असे सुत्राने नमुद केले. त्यामुळे देशातील इतर शहरांमध्ये नागपुरातील उपाययोजनांचा वापर होण्याची शक्‍यता आहे. 

मृत्यूदरात घसरण 
शहरात सुरुवातीपासून मृत्यूदर कमी आहे. मार्च महिन्यात पहिल्या रुग्णाची नोंद झाली. पहिल्या रुग्णांच्या नोंदीनंतर 20 दिवसांनी 4 एप्रिलला पहिल्या मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात तीन मृत्यू झाले. मे महिन्यात 8 तर जून महिन्यात 4 मृत्यूची नोंद आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही मृत्यू दर 2 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. 

बरे होऊन परतणाऱ्यांच्या संख्येत वाढ 
शहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे तर दुसरीकडे उपचारानंतर घरी परत जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. बुधवारपर्यंत एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 66 टक्के आहे. 31 एप्रिलपर्यंत हेच प्रमाण 31.85 होते. रुग्णांना घरी सोडण्याच्या धोरणामध्ये बदल करण्यात आल्याने हे प्रमाण वाढल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur's pattern of corona is all over the country