हीच ती वेळ; शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांपासून बाजूला व्हावे, कोण म्हणालं असं...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रविवारी ऍग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत ई संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, ऍग्रो व्हिजनचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्यक्ष रमेश मानकर, आमदार सावरकर आदी सहभागी झाले होते.

नागपूर :  परंपरागत पिकांपासून शेतकऱ्यांनी बाजूला होण्याची वेळ आली आहे. जागतिक स्तरावर मागणीचा अभ्यास करून पीक घ्यावे, असा सल्ला केंद्रीय महामार्ग, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला. तेलबीयांचे उत्पादन वाढविण्याची गरज व्यक्त करतानाच 10 ते 15 जूनपर्यंत कापूस खरेदी व्हावा, यासाठी प्रयत्नरत असल्याचे नमूद करीत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

 

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रविवारी ऍग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत ई संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, ऍग्रो व्हिजनचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्यक्ष रमेश मानकर, आमदार सावरकर आदी सहभागी झाले होते.

 

शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेले पाहिजे. अधिक उत्पादन झाले तर सरकार गहू, तांदळाला भाव देऊ शकणार नाही. अशावेळी जागतिक बाजारपेठेत कशाची मागणी अधिक आहे, याचा अभ्यास करून त्या वस्तूचे उत्पादन घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. सोयाबीनचे एकरी उत्पादन अल्प असून, ते वाढविण्यावर भर दिला पाहिजे. जमिनीतील ऑर्गेनिक कार्बनचे प्रमाण वाढले तर शेतकऱ्याच्या उत्पादनातही अडीच पटीने वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात मधमाशीपालन प्रकल्प वाढले तर मध उत्पादन वाढणार आहे. मधमाशीपालन उद्योगामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न 20 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. मालगुजारी तलावात मत्स्यपालन योजना तयार झाली पाहिजे. ताडीमाडी प्रकल्पासाठी 500 कोटी केंद्राने मंजूर केले. यातून 40 हजार लोकांना रोजगार मिळेल. वनौषधीसाठी 5 लाख कोटी मिळणार आहे. यामुळे 10 लाख हेक्‍टरमध्ये हर्बल शेती करणे फायदेशीर ठरणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी 30 लाख लिटर दूध उत्पादन करणे आवश्‍यक आहे. विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

धापेवाडा होणार पहिले स्मार्ट व्हिलेज

धापेवाडा येथे पहिले स्मार्ट व्हिलेज तयार करण्याचा मानस गडकरींनी यावेळी व्यक्त केला. साडेतीन लाखांत गावकऱ्यांना सुंदर बंगला देण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. खेडे समृद्ध झाले तरच शहरात झोपड्या निर्माण होणार नाहीत असेही ते म्हणाले. एमएसएमईतर्फे 10 लाख महिलांना सोलर चरखा देणार आणि त्यांचे सूतही आम्ही घेणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय एका व्यासपीठावर

शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस व भाजपचे नेते एका व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री केदार, मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार हे कॉंग्रेसचे तर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे उपस्थित होते. केदार यांनी केंद्राची मदत मिळवून देण्याची गडकरींना विनंती केली. वडेट्टीवार यांनीही शेतकऱ्यांसाठी पक्षभेद विसरून काम करू, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need to produce according to global demand