नवी वास्तू...नवे नाव...आज संपणार उत्कंठा

राघवेंद्र टोकेकर
रविवार, 19 जानेवारी 2020

धनवटे रंगमंदिराशी जुळलेले नागपूरकर रसिकांचे ऋणानुबंध आता इतिहासजमा होणार आहेत. कारण, धनवटे रंगमंदिर 1993 सालीच पाडण्यात आले. तेथे आता अद्ययावत सभागृह उभारण्यात आले आहे.

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वास्तूत नव्याने उभारण्यात आलेल्या उपराजधानीचा सांस्कृतिक वसा जोपासणाऱ्या धनवटे रंगमंदिराचे नामांतर करण्यात येणार आहे. रविवारी विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन सोहळा आहे. याच कार्यक्रमात नवे नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. तसे सूतोवाच यापूर्वीच संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी केले आहे.

नवे सभागृह "रंगशारदा' नावाने ओळखले जावे, अशी इच्छा मनोहर म्हैसाळकर यांनी व्यक्‍त केली होती. तसेच इतरांनीही नावे सुचविण्याचे आवाहन केले होते. साधारणत: नव्वदीच्या काळात उपराजधानीतील सांस्कृतिक वैभव अनेकांनी अनुभवले आहे. धनवटे रंगमंदिरात होणारे नाट्यप्रयोग, तिकिटासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगा आणि प्रयोग पाहताना रसिकांना व नाट्यकलावंतांना आलेले अनुभव स्मरणात राहतील असेच आहेत. रंगमंदिराच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ साहित्यिक नाना जोग यांनी स्वत:चे घर सोडून याच परिसरात बांधलेली लोहकुटीदेखील अनेकांना विसरणे शक्‍य नाही. धनवटे रंगमंदिराशी जुळलेले नागपूरकर रसिकांचे ऋणानुबंध आता इतिहासजमा होणार आहेत. कारण, धनवटे रंगमंदिर 1993 सालीच पाडण्यात आले. तेथे आता अद्ययावत सभागृह उभारण्यात आले आहे.
पन्नासच्या दशकात सीताबर्डीतील झाशी राणी चौकातील बाबूराव धनवटे रंगमंदिराच्या निर्मितीचा निधी ज्या नाट्यप्रयोगातून उभारण्यात आला, त्याच "अंमलदार' नाट्यप्रयोगाचे रविवारी नवनिर्मित सांस्कृतिक सभागृहात सादरीकरण झाले. या प्रयोगानंतर मनोहर म्हैसाळकर यांनी रसिकांशी संवाद साधला. सभागृहाची तपासणी व्हावी, या उद्देशाने झालेल्या "अंमलदार'च्या नाट्यप्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी सभागृहाचे लोकार्पण होण्यास वेळ लागत असल्याचे दु:ख मनोहर म्हैसाळकर यांनी व्यक्‍त केले.

 असे आहे सभागृह
वैदर्भी नाट्यरसिकांसाठी आधारकेंद्र ठरावे अशा सभागृहाची निर्मिती विदर्भ साहित्य संघाने केली आहे. प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ आशुतोष शेवाळकर यांच्या संकल्पनेवर आधारित या रंगमंदिराची रविवारी प्राथमिक चाचणी झाली. 1250 प्रेक्षक या रंगमंदिरात बसू शकतात. येथे मिनी थिएटर, कलादालन, ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ, अभ्यागत दालने, कार्यालय, सभागृह, पार्किंग, ऍम्पी थिएटर, टेरेस गार्डन, सुशोभित दीर्घा यांसह कार्यालयाची विशेष सोय करण्यात आली आहे.

धनवटे रंगमंदिराचा इतिहास
वि. सा. संघाच्या रंगमंदिराच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी नाना जोगांनी "अंमलदार' पुलंकडून लिहून घेतले. या नाटकाचे विदर्भात 1 हजार 520 प्रयोग झालेत अन्‌ धनवटे रंगमंदिराच्या निर्मितीसाठी निधी गोळा केला. पुढे रंगमंदिराने कलावंत घडविलेच; सोबत रसिकांनाही समृद्ध केले. रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाकडे होते. येथे साहित्यप्रेमी तासन्‌तास बसत. प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत राम शेवाळकर, सुरेश भट आणि कवी ग्रेस येथेच भेटत. या बाकड्यांवरील जुन्या पिढीच्या आठवणी कधीही वजा होणे नाही.

"रंगशारदा'च का?
रंगदेवता आणि बुद्धीची देवता शारदा, म्हणून रंगमंदिराचे नाव "रंगशारदा' असावे, असे वि. सा. संघाचे अध्यक्ष म्हणाले. मात्र, हा निर्णय अंतिम नाही. रसिकांनी सभागृहासाठी नावे सुचवावी, असे आवाहन मनोहर म्हैसाळकर यांनी केले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New building...New name