esakal | कोरोना मास्कवरती पैठणीचा मोर नाचरा हवा...आता मास्कच्याही नाना तऱ्हा
sakal

बोलून बातमी शोधा

mask

कोरोनामुळे लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रमच रद्द झाले आहेत. त्यामुळे यंदा महिलांना पैठणीची हौस पूर्ण करता आली नाही. परंतु, सध्या महिला आपली हौस पैठणी साडीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करून तयार केलेल्या आकर्षक "पैठणी' मास्कने पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना मास्कवरती पैठणीचा मोर नाचरा हवा...आता मास्कच्याही नाना तऱ्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना महामारीने जगाला स्वच्छतेचा महामंत्र तर दिलाच याबरोबर कसे जगावे याचीही शिकवण दिली. चेहऱ्यावर मास्क लावणे ही काळाची गरज झाली आहे. घराबाहेर पडायचे असेल तर, पहिल्यांदा मास्क लावा नंतरच घराबाहेर पडा असा शिरस्ता झाल्याने, आता कपड्यांवर मॅंचिंग मास्कही मिळणे सुरू झाले आहेत. महिलांच्या साड्या, ड्रेस याशिवाय पुरुषांनाही शर्ट, टिशर्ट वर मॅचिंग मास्क उपलब्ध करून दिले जात आहे.

कोरोनामुळे लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रमच रद्द झाले आहेत. त्यामुळे यंदा महिलांना पैठणीची हौस पूर्ण करता आली नाही. परंतु, सध्या महिला आपली हौस पैठणी साडीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करून तयार केलेल्या आकर्षक "पैठणी' मास्कने पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे मास्क वापरणे सर्वांसाठीच बंधनकारक झाले आहे. मात्र, त्यातही अनेकजण रंगीबेरंगी, कार्टूनचे डिझाईन असलेले मास्क वापरून आपली हौस भागवून घेत आहेत. एकाने तर चांदीचाच मास्क तयार करून घेतला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. त्यात आता मराठमोळ्या पैठणी मास्कची भर पडली आहे. काही महिला व्यावसायिकांनी पैठणीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करून साडी, ड्रेसवर मॅचिंग होईल आणि रोज धुवून वापरता येतील, असे पैठणी मास्क तयार केले आहेत. हे मास्क दोन लेअरमध्ये असून, मास्कची वरची लेअर सेमी पैठणीची तर आतील लेअर सॉफ्ट कॉटनची बनवलेली आहे. पुरुषांसाठीही आकर्षक प्रीटेंड खादी मास्क बनवण्यात आले आहेत. दिसायला आकर्षक आणि दररोज धुवून वापरता येत असल्याने महिलांची या मास्कला अधिक पसंती मिळत आहे.

वधू वरासाठी विशेष मास्क
लग्न समारंभात वधू-वरासाठी "प्रीमियम पैठणी मास्क आणि खादी मास्क' चे पॅकेज तयार करण्यात आले आहे. लग्नात वधूचा मेकअप, हेअरस्टाईल व्यवस्थित राहावी आणि कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी तीन लेअर असलेला "प्रीमियम पैठणी' मास्क तर वरासाठी सुटवर मॅचींग असलेला "प्रीमियम खादी' मास्क तयार करण्यात आला आहे.

 हेही वाचा -  नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय...

बाजारात उपलब्ध मास्क
कापडी मास्क, सर्जिकल मास्क, डिझायनर मास्क आणि साधे घरगुती मास्क बाजारात दिसत आहेत. काही मास्कना तीन पदर आहेत. सर्वांत बाहेरचा पदर सुती, मध्ये फिल्टर आणि आतला मलमलपासून तयार केला आहे. अनेक मास्कच्या बाहेरच्या पदरावर आकर्षक नक्षी आहेत. लहान मुलांसाठी कार्टून, मासे, प्राणी, पक्षी, फुलं यांच्या नक्षीचे, ड्रॅक्‍युला, युनिकॉर्नचेही मास्क तयार करण्यात आले असून ते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. काहीजणांच्या मास्कला व्हॉल्व्ह असते, आतली हवा बाहेर जाते पण बाहेरील हवा आत येत नाही. याचा फायदा असा की त्यामुळे घुसमटल्यासारखे होत नाही. शिवाय आतमधली उष्णता बाहेर फेकली गेल्याने गरम होत नाही.

मास्क भेट द्यावा
विवाह सोहळा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ओटी भरताना मास्कही भेट द्यावा. एरवी ओटीत घातलेल्या कापडाचा काहीही उपयोग होत नसल्याने ते कापड उपयोगात येत नाही. त्याऐवजी आता भेट म्हणून मास्क दिला तर ती भेट सर्वांनाच आवडेल. विवाह समारंभामध्ये अक्षतांबरोबर गुलाबाचे फूल देण्याची फॅशन होती. आता त्याऐवजी मास्क द्यावा म्हणजे दिलेली वस्तू वापरात तरी येईल.
सीमा गोतमारे, मास्क विक्रेता, नागपूर.