या कॉंग्रेस नेत्यांची नवी पिढी राजकारणात सक्रिय 

राजेश प्रायकर
रविवार, 12 जुलै 2020

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने काल, प्रदेश कार्यकारिणीची यादी जाहीर केली. यात शहरातील केतन ठाकरे व याज्ञवल्क्‍य जिचकार यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. याखेरीज नगरसेविका नेहा निकोसे यांनाही सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली असून आणखी काही कार्यकर्त्यांची चिटणीसपदी निवड झाली आहे. 

नागपूर : शहरातील कॉंग्रेस नेत्यांची नवी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली असून महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने त्यांच्यावर जबाबदारीही सोपवली आहे. प्रदेश युवक कॉंग्रेसने जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत आमदार विकास ठाकरे यांचे पूत्र केतन व दिवंगत श्रीकांत जिचकार यांचे पूत्र याज्ञवल्क्‍य जिचकार यांना संधी दिली आहे. याखेरीज नगरसेविका नेहा निकोसे यांनाही सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली असून आणखी काही कार्यकर्त्यांची चिटणीसपदी निवड झाली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने काल, प्रदेश कार्यकारिणीची यादी जाहीर केली. यात शहरातील केतन ठाकरे व याज्ञवल्क्‍य जिचकार यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. केतन ठाकरे यांच्यानिमित्त शहर कॉंग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची पुढील पिढी राजकारणात सक्रिय झाली.

विकास ठाकरे शहराचे महापौर होते. महापालिकेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले. शहर कॉंग्रेसमध्ये त्यांचा दबदबा असून आमदार झाल्यानंतरही त्यांचे वर्चस्व आणखी वाढले. केतन यांनी वडील विकास ठाकरे यांचे राजकारण जवळून पाहिले आहे. राजकारणात ते वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

याज्ञवल्क्‍य जिचकार यांचे वडील दिवंगत श्रीकांत जिचकार यांच्या नावाचा दबदबा आजही कायम आहे. कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेते श्रीकांत जिचकार यांचे नाव आदराने घेतात. त्यांचा राजकारणातील वारसा याज्ञवल्क्‍य जिचकार पुढे येणार आहे. या दोन तरुणांमुळे राजकारणातील दिग्गजांची नवी पिढी सक्रिय झाली. याशिवाय पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल राऊत प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत.

...तर शहरात पुन्हा "लॉकडाउन'! वाचा नेमके काय म्हणाले तुकाराम मुंढे

नगरसेविका नेहा निकोसे यांनाही राजकीय पार्श्‍वभूमी असून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील सागर चव्हाण, वसीम शेख, नितीन सरनाईक, रोहित खैरवार, भूषण मरस्कोल्हे, आसिफ शेख, फजलूर कुरेशी, धीरज धकाते, चक्रधर भोयर, नीलेश खोरगडे, पियूष वाकोडीकर, अफजल शाह, रौनक चौधरी, प्रवीण जामभुले, रंजीत बोराडे यांचीही चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. 
 
राजकीय वारसा 
राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या पिढीचा समृद्ध वारसा शहराला लाभला आहे. यात भाजपमधील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, कॉंग्रेसमधील प्रफुल्ल गुडधे पाटील, विशाल मुत्तेमवार, गिरिश पांडव, ऍड. अभिजित वंजारी, सेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी ही काही प्रमुख नावे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new generation of these Congress leaders active in politics