विद्यार्थिनींनो बाहेर जाताय... निर्भया पथकाला माहिती द्या!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

विद्यार्थी कल्याण विभागाने या विद्यार्थिनी सुरक्षित असाव्यात यासाठी नवा नियम तयार केला आहे. यासाठी शहराबाहेर कुठल्याही कामासाठी जात असताना प्राचार्यांनी विद्यार्थिनीची सर्व माहिती संबंधित पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाला द्यावी लागणार आहे.

नागपूर : गेल्या काही वर्षात विद्यार्थिंनी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने अभिनव कल्पना राबवित, विद्यार्थिनींना चर्चासत्र, कार्यशाळा वा इतर शैक्षणिक कामासाठी बाहेरगावी जायचे असल्यास, संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य वा विभागप्रमुखांना विद्यार्थिंनींची माहिती संबंधित पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाला द्यावी लागणार आहे. तशी अधिसूचना विद्यार्थी कल्याण संचालकांनी महाविद्यालयांना पाठविली आहे.

शहरात तरुणींच्या अपहरणांच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. शहरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या बऱ्याच मुली या आजूबाजूच्या शहर वा गावातून येत असल्याने त्यांच्याबद्दल कुटुंबीयांना माहिती मिळणे गरजेचे असते. अशावेळी अनेकदा शैक्षणिक कामासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थिनी संकटात सापडल्यास त्यांची माहिती पोलिसांना मिळण्यास बराच उशीर होतो. त्यामुळे वेळीच तपास होत नसल्याने अनेकदा प्रकरणास वेगळे वळण लागण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थी कल्याण विभागाने या विद्यार्थिनी सुरक्षित असाव्यात यासाठी नवा नियम तयार केला आहे. यासाठी शहराबाहेर कुठल्याही कामासाठी जात असताना प्राचार्यांनी विद्यार्थिनीची सर्व माहिती संबंधित पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाला द्यावी लागणार आहे. शिवाय विद्यार्थी कल्याण विभागालाही त्याची प्रत पाठवावी लागणार आहे. त्यामुळे हे पथक सातत्याने विद्यार्थिनींच्या संपर्कात राहणार आहे. यादरम्यान कुठलीही समस्या वा संकट आल्यास पथक विद्यार्थिनींना मदत करेल. तशी अधिसूचना महाविद्यालयांना पाठविली आहे.

विद्यार्थिनींना होणार फायदा
विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध ठिकाणी होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचा फायदा निश्‍चितच विद्याथिनींना होणार आहे.
डॉ. अभय मुद्‌गल,
संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya squad watching you, when you are outside of city