तुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

तुकाराम मुंढे जिथे गेले तेथे पदाधिकारी आणि पुढाऱ्यांशी त्यांचे पंगे झाले आहेत. काटेकोर नियम पाळत असल्याने त्यांच्याशी कोणाचेच पटत नाही. सत्ताधाऱ्यांना पटापट कामे कारायची घाई असल्याने मुंढे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही.

नागपूर : राज्यातील युतीची सत्ता गेली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तुकाराम मुंढे यांना पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. ते खरेही ठरले आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यायला सुरुवात केली आहे.

नागपूर महापालिकेत सुमारे तेरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच महापालिकेत महापौरसुद्धा राहिले आहे. त्यामुळे मुंढे यांना मुद्दामच पाठविण्यात आल्याचाही चर्चा यानिमित्ताने होत आहे. मात्र, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांची बाजू घेतली होती. विनाकारण अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, असेही त्यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना बजावले होते.

बापरे! - विवाहित मैत्रिणीला भररस्त्यात केली ही मागणी... वाचा काय झाले नंतर

तुकाराम मुंढे जिथे गेले तेथे पदाधिकारी आणि पुढाऱ्यांशी त्यांचे पंगे झाले आहेत. काटेकोर नियम पाळत असल्याने त्यांच्याशी कोणाचेच पटत नाही. सत्ताधाऱ्यांना पटापट कामे कारायची घाई असल्याने मुंढे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही. आतापर्यंत तेरावेळा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी दहा बदल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून झाल्या आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेत ते मुख्याधिकारी होते. येथे रुजू होताच पहिल्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेटी दिल्या होत्या. अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना निलंबित केले होते. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप त्यांनी बंद केला होता. त्यामुळे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला होता. आजवरच्या किश्‍श्‍यांमुळे महापालिकेतील कर्मचारीसुद्धा धास्तावले आहेत. ते केव्हा रुजू होतील याचा काही नेम नसल्याने एरवी रोजच तासभर उशिरा येणारे कर्मचारीसुद्धा बुधवारी झाडून दहाच्या ठोक्‍याला हजर होते.

अधिक माहितीसाठी - 'ती' उपचारादरम्यान म्हणाली दोन पैसे जमा करा, मुलांचा सांभाळ करा

पदभार टळला

तुकाराम मुंढे आयुक्तपदाचा गुरुवारी कार्यभार सांभाळणार होते . मात्र, ते न आल्याने पदभार समारंभ होऊ शकला नाही. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना नागपूर महापालिका घोटाळ्यांमुळे राज्यभर चांगलीच गाजली होती. क्रीडा घोटाळ्यात अनेक नगरसेवकांना त्यांनी पोलिस कोठडी दाखवली होती. आता तुकाराम मुंढे यांना महाआघाडी सरकारने नागपूरला पाठवले असल्याने कोणते घबाड बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC staff started coming on time before joining of commissioner tukaram mundhe