या शहरात तीन दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही, मात्र ताण कायम...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

अमेरिकेतून आलेल्या या रुग्णाचे कुटुंबही बाधित झाले होते. मात्र, हे कुटुंब योग्य उपचारातून कोरोनामुक्त झाले. शहरात दिल्लीतून आलेल्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे कोरोनाचा आकडा वाढला. 16 वर आकडा पोहोचला.

नागपूर : शहरात 31 मार्च ते दोन एप्रिल असे तीन दिवस एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. ही मनाला दिलासा देणारी बाब आहे. मात्र, मेयो आणि मेडिकलमध्ये कोरोना संशयितांचा आकडा कमी होत नाही आहे. मेयो-मेडिकलमध्ये 68 संशयित दाखल आहेत. त्यात दिल्ली येथील मरकज येथून नागपुरात आलेल्या पन्नासपेक्षा अधिक व्यक्तींना विलगीकरण कक्षात आणले आहेत. 

मेडिकलसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून जोखमीच्या वस्त्यांमधील कोरोना संशयितांचे आलेले नमुने तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे नमुने योग्य तापमानात ठेवण्यात येतात. विशेष असे की, हे नमुने तपासण्याचे काम सुरू असताना दिल्ली येथील मरकजमधील 54 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवले. हे काम अतिशय जलद गतीने सुरू असल्याने शुक्रवारी तपासणी पूर्ण होईल आणि त्यानंतर मरकजमधून परत आलेल्या नागरिकांच्या अहवालाबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती मिळाली. 

आरोग्य विभागाकडून यापूर्वी कोरोनाबाधित आढळून आलेल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागपुरात 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला. यानंतर उपराजधानीत कोरोनाची दहशत पसरली. अमेरिकेतून आलेल्या या रुग्णाचे कुटुंबही बाधित झाले होते. मात्र, हे कुटुंब योग्य उपचारातून कोरोनामुक्त झाले. शहरात दिल्लीतून आलेल्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे कोरोनाचा आकडा वाढला. 16 वर आकडा पोहोचला. 

जाणून घ्या - विक्रीसाठी आली ताजी मासोळी अन् अवघ्या तासाभरात झाली फुर्रर्र...

आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेने अतिशय जागरुकता दाखवत संपर्कातील साऱ्यांचा शोध घेतला. यामुळेच मागील तीन दिवसांच्या साखळीत खंड पडला. मेयोत दर दिवसाला शंभर नमुन्यांची चाचणी होते. प्रशासनाने निश्‍चित केलेल्या निकषानुसार प्रथम उपचाराशी संबंधित डॉक्‍टरांसह आरोग्य कर्मचारी व कोरोनाग्रस्ताच्या थेट संपर्कात आलेले व्यक्ती, विदेशी प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींचा तसेच लक्षणे आढळून आलेल्या व्यक्ती, न्युमोनिया असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाते. यानंतर विलगिकरणात असलेल्यांच्या तपासणीचा क्रम लागतो. गुरुवारी (ता. 2) रात्रीपर्यंत जोखमीतील व्यक्तींचे नमुने तपासणीचे काम सुरू होते. 

तपासणीसाठी सात तास

एका तपासणीच्या सायकलसाठी सुमारे सात तासांचा कालावधी लागतो. दर दिवसाला 21 तासांत तीन सायकल तपासले जातात. यामुळे मरकजमधील नागरिकांच्या तपासणीचा अहवाल शुक्रवारी येईल असे सांगण्यात आले. गुरुवारी मेडिकल आणि मेयोत दाखल केलेल्या संशयितांचीही संख्या कमी होती. मात्र, एकूण दाखल संशयितांची संख्या 68 आहे. एक एप्रिल रोजी 98 नमुने तपासल्यानंतर सर्वच निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित झालेल्याची साखळी खंडित झाली. गुरुवार 2 एप्रिल रोजी 80 पेक्षा अधिक नमुने तपासण्यात आले. सर्वच नमुने निगेटिव्ह आले. 

मृत व्यक्‍तीचा अहवाल निगेटिव्ह

बुधवारी रात्री नमुने तपासणीसाठी मेयोत पाठवले आहेत. मात्र, जोखमीच्या उंबरठ्यावर असलेल्या कोरोना संशयितांचे नमुने तपासणीचा ताण असल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत हे नमुने तपासले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. बुधवारी दगावलेला मध्यप्रदेशातील संशयित व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आला. यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःस्वास सोडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No corona positive patient in three days in Nagpur