ना फळं आले, ना बाग फुलली, योजना मध्येच रखडली, कारण आहे निधीचे

file
file

जलालखेडा (जि.नागपूर) : खरीप व रब्बी पिकावर शेतकरी अवलंबून राहिला तर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवड करण्याकरिता वळविण्यासाठी शासनाने विविध योजना राबविण्यास सुरुवात केली. पण याला मागील काळात नरखेड तालुक्यात पाण्याची कमी असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. परंतु मागील काही वर्षांपासून चांगल्या पावसाळ्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे वळला आहे. पण यावर्षी शासनाने निधी दिला नसल्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

अधिक वाचाः दसरा-दिवाळी या सणसंमारंभाच्या काळात अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

७५० हेक्टरवरील फळबाग लागवड रखडली
सन २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येते. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते. या योजनेत तीन वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे ५०, ३० व २० टक्‍के अनुदान देण्यात येते. प्रशासकीय कारवाई पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते. पण या वर्षात ही योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही नसून यासाठी निधी देण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळणार नाही, हे विशेष.

नरखेड तालुक्यातील ९१२ शेतकरी लाभापासून वंचित
 या योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये नरखेड तालुक्यातील १८५ शेतकऱ्यांना १६७.५० हेक्टर फळबाग लागवडीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेमध्ये फळबागांच्या संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू लागवडीसाठी प्रति हेक्टर २७७ झाडांसाठी ६२५७८ रुपये अनुदान देण्यात येत असल्यामुळे यावर्षी सन २०२०-२१ जे शेतकरी महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत बसत नाही. अशा नरखेड तालुक्यातील ९१२ शेतकऱ्यांनी ७५० हेक्टरमध्ये फळबाग लागवडीसाठी नरखेड तालुका कृषी विभागाकडे अर्ज केले होते. यासाठी कागदपत्रे गोळा करून सादर करण्यासाठी प्रति शेतकरी १०० रुपये खर्च ही झाला. पण आता शेतकरी त्यांच्या अर्जाचे काय झाले, याची विचारणा करीत असून त्यांना निधीअभावी कोणाचेही अर्ज मंजूर करण्य्तात आले नाही, असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे. या योजनेत भाग घेऊन झाडे लागवडीचा कालावधी मे ते नोव्हेंबर असा असल्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच अर्ज दिले होते. शासनाच्या या योजनेत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी शेती तयार देखील होती. पण त्यांचा अर्ज मंजूर न झाल्याने त्यांची निराशा झाली आहे. फळ विक्रीसाठी येईपर्यंत फळबागासाठी खर्च जास्त येत असल्यामुळे व शेतकऱ्यांकडे निधी राहत नसल्यामुळे शेतकरी फळबाग लागवड करीत नाही. पण शासनाच्या या योजनेचा लाभ मिळेल तर फळबाग तयार होऊन पुढील पाच वर्षात परिस्थितीत सुधारणा होईल, या आशेने शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, पण त्यांच्या पदरी शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे निराशा पडली आहे. तर केंद्र शासनाच्या महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत नरखेड तालुक्यातील १८५ शेतकऱ्यांचे १५८ हेक्टर फळबाग लागवडीसाठीचे अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

गंभीरपणे विचार करून योजना राबवावी
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी नरखेड तालुक्यातील ९१२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील एक मी ही आहे. परंतू लागवडीचा हंगाम निघून गेला. तरीही एकाही शेतकऱ्याचा अर्ज मंजूर झाला नाही. या योजनेसाठी निधीच आला नाही असे कळते. यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा बोजवारा उडाला आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठीच पैसे नाहीत, ह्यापेक्षा दुसरी शोकांतिका असूच शकत नाही. शासनाने यावर गंभीरपणे विचार करून ही योजना राबवावी, एवढीच अपेक्षा.
-दिलीप काळमेघ
 प्रगतीशील शेतकरी तथा योजनेचे अर्जदार शेतकरी, जामगाव (बु.)

निधीअभावी अर्ज मंजूर करण्यात आले नाही
नरखेड तालुक्यात पाण्याची पातळी वाढल्यामुळे व जनजागृतीमुले शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीकडे वळला आहे. याचाच परिणाम म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत अर्ज प्राप्त झाले आहे. पण निधीअभावी कोणाचे ही अर्ज मंजूर करण्यात आले नाही.
-डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com