खेळांमध्येही सवतासुभा? बुध्दिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच

divya deshmukh
divya deshmukh

नागपूर : ऑलिम्पिक किंवा इतर मोठ्या स्पर्धांमध्ये पदक तसेच विजेतेपद मिळविले तर खेळाडूंचा उदोउदो होतो. त्यांच्यावर कोट्यवधींची खैरात केली जाते. मात्र ऑलिम्पियाडमध्ये देशाला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून देऊनही भारतीय बुद्धिबळ संघ दुर्लक्षित राहिला आहे. या विजयात उल्लेखनीय योगदान देणारी नागपूरची कन्या दिव्या देशमुखसह राज्यातील अन्य दोन बुद्धिबळपटूंच्या पाठीवरही महाराष्ट्र सरकारने अद्याप पुरस्काररुपी शाबासकीची थाप न ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या रविवारी पार पडलेल्या फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. जगभरातील नामवंत बुद्धिबळपटूंचा सहभाग राहिलेल्या या स्पर्धेत भारताला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि संघाचा कर्णधार विदित गुजराथी व भक्ती कुलकर्णी या महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा सिंहाचा वाटा होता.

या अद्वितीय कामगिरीनंतर साहजिकच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी, सरकारकडून त्यांच्यासाठी मोठ्या पुरस्कार राशीची घोषणा व्हावी, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने तसे काहीच घडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री किरेन रिजिजू व वित्तमंत्री निर्मला सीतारामनसह अनेकांनी ट्वीट करून संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन केले. मात्र केंद्र सरकार, क्रीडा मंत्रालय किंवा भारतीय बुद्धिबळ महासंघापैकी कुणीही खेळाडूंना अद्याप रोख पुरस्कार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला नाही.

एरवी ऑलिम्पिक किंवा अन्य मोठ्या स्पर्धामध्ये पदक जिंकले की, खेळाडूंवर लगेच कोट्यवधीची उधळण केली जाते. भारतीय क्रिकेट संघाने 'वर्ल्डकप' जिंकल्यानंतर बीसीसीआयही आपली तिजोरी उघडते. मात्र भारतीय बुद्धिबळ संघाकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता ऑलिम्पियाड मोठी स्पर्धा आहे. सुवर्णपदक जिंकण्यासाठी जगभरातील देश आपली ताकद झोकून देतात.

भारताला आतापर्यंत कधीही ही स्पर्धा जिंकता आली नाही. यावेळी भारतीय खेळाडूंनी तो पराक्रम पहिल्यांदाच करून दाखविला. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदनेही अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्याउपरही पुरस्काराच्या बाबतीत खेळाडू दुर्लक्षित राहिले. विजेत्या संघात महाराष्ट्राचे तीन खेळाडू असताना राज्य सरकारनेही त्यांच्या कामगिरीची दखल घेतली नाही. याबद्दलही बुद्धिबळ वर्तुळात आश्चर्य व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने तशी भावना बोलूनही दाखविली.

सविस्तर वाचा - त्या महिलांचा दुर्गावतार! चक्क दारू विक्रेत्यावरच हल्लाबोल

भारतीय संघातील खेळाडू अजिबात गरीब नाहीत. दिव्याचे आईवडीलही व्यवसायाने डॉक्टर्स आहेत. यापैकी कुणी रोख पुरस्काराची मागणीदेखील केली नाही. मात्र देशाला व राज्याला नावलौकिक मिळवून देणाऱ्या या खेळाडूंचा रोख पुरस्कार देऊन यथोचित सन्मान व्हायला पाहिजे होता, असे अनेकांना वाटू लागले आहे.

राज्य सरकारने सन्मानित करावे
'ऑलिम्पिक किंवा अन्य स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर खेळाडूंवर रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जातो. यापूर्वी अनेकवेळा हे घडले आहे. ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने भारतीय बुद्धिबळ संघही सन्मानाचा हकदार आहे. दुर्दैवाने अद्याप यासंदर्भात कोणीही घोषणा न केल्याने आश्चर्य वाटते आहे. निदान राज्य सरकारने तरी महाराष्ट्राच्या खेळाडूंना सन्मानित करावे, अशी माझी अपेक्षा आहे.'

के. के. बराट, सचिव, नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटना


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com