सोलापूर पोलिसांची नागपुरात कारवाई; कुख्यात क्रिकेट बुकी रिंकू अग्रवालला केली अटक

अनिल कांबळे
Friday, 13 November 2020

उपराजधानीत कुख्यात क्रिकेट बुकींमध्ये रिंकू अग्रवालचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही शहरातील बुकींची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

नागपूर : उपराजधानीतील कुख्यात बुकी अमित ऊर्फ रिंकू गोविंदप्रसाद अग्रवाल (वय ४५, रा. भांडेवाडी) याच्यासह तिघांना सोलापूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट सट्टा अड्डयावर त्यांच्या जिल्ह्यात कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात रिंकू अग्रवालला अटक करण्यात आली, हे विशेष...

उपराजधानीत कुख्यात क्रिकेट बुकींमध्ये रिंकू अग्रवालचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही शहरातील बुकींची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रिंकू पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

गेल्या सहा नोव्हेंबरला सोलापूर पोलिसांनी त्यांच्या जिल्ह्यात एका क्रिकेट सट्टा अड्डयावर छापा टाकला होता. त्यातील आरोपी रिंकूकडे लागवडी करीत असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर सोलापूर पोलिस रिंकूच्या शोधात होते.

१० नोव्हेंबरला आयपीएल मालिका संपली. त्याच्या आनंदात रिंकू व त्याचे काही साथीदार पार्टी करण्याच्या उद्देशाने ११ नोव्हेंबरला कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फार्महाऊसवर गेले होते. त्या ठिकाणाहून सोलापूर पोलिसांनी रिंकू याच्यासह सुनील गंगाशाह शर्मा (वय ४८, रा. भाजीमंडी, इतवारी) आणि राहुल प्रल्हाद काळे (रा. हिवरे ले-आऊट, लकडगंज) यालाही अटक केली.

अधिक वाचा - शेतकऱ्यांना दिवाळी भेट; पीक नुकसानीचे २७ कोटी मिळाले

बुकींच्या वर्तुळात खळबळ

सर्वांना गुरुवारी सोलापूर पोलिसांनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करून ट्राझिंट रिमांडवर सोलापूरला घेऊन गेले. सोलापूर पोलिसांच्या कारवाईमुळे नागपूर शहरातील मोठ्या बुकींच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notorious bookie Rinku Agarwal arrested