esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शेवटच्या टप्प्यात तो केंद्रातील अन्य सदस्यांना सांभाळू लागला. बुधवारी वडील सुरेश नंदेश्वर हे सुधरलेल्या मुलाला घेण्यासाठी केंद्रात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. तर, सिद्धार्थच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. 

आधी होता कुख्यात गुंड; आता झाला वाल्याचा वाल्मीकी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नशेच्या आहारी गेलेल्या कुख्यात गुन्हेगाराला व्यसनमुक्‍त करून समाजात पूर्ववत स्थान मिळवून देण्याची किमया अजनी पोलिस आणि एका व्यसनमुक्‍ती केंद्राने साध्य केली. बुधवारी हा गुन्हेगार नशेच्या गर्तेतून बाहेर पडला. सिद्धार्थ नंदेश्‍वर (रामटेकेनगर) असे त्याचे नाव. 

सिद्धार्थने पोलिस चौकी चक्‍क पाच वेळा जाळली होती, हे विशेष. 
सिद्धार्थ नंदेश्‍वर (27, रा. रामटेके नगर, गल्ली नंबर 6) हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर एका हत्याकांडासह घरफोडी, चोरी असे अनेक गुन्हे दाखल होते. रिंग रोड, शताब्दी चौकातील पोलिस चौकी आतापर्यंत पाच वेळा त्याने जाळली. त्याच्या कृत्यामुळे नागरिक त्रस्त होते. शेवटी अजनी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष खांडेकर यांनी त्याच्या गुन्हेगारी जगताची पार्श्वभूमी तपासली असता तो पूर्णतः नशेच्या आहारी गेल्याचे सर्वांनी सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो तंबाखू, विडी, नेलपॉलिश काढायचे स्पिरिट, सोल्युशन, गर्द, गांजा, दारू यासह मिळेल त्या पदार्थाची नशा करीत असल्याचे पुढे आले.

पीआय खांडेकर यांनी सेकंड पीआय जामदार यांच्याशी चर्चा केली. त्याला कारागृहाऐवजी नशामुक्ती केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेतला. साहस या केंद्राचे संचालक विजय शेंडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पीआय खांडेकर आणि पीआय जामदार यांची समाजाप्रति असलेली संवेदनशीलता बघून साहस केंद्राने निःशुल्क उपचार करण्याची तयारी दर्शविली. 11 मार्चला केंद्रात दाखल झालेला सिद्धार्थ पूर्णतः सुधरला. बुधवारी गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत त्याला केंद्रातून निरोप देण्यात आला. त्याने पुन्हा आपल्या सामान्य आणि सामाजिक जीवनास प्रारंभ केला. 

हेही वाचा : अखेर ते 233 विद्यार्थी मायभूमीकडे रवाना 

योग, ध्यानसाधनेमुळे शक्‍य 
अजनी पोलिसांनी सिद्धार्थला केंद्रात दाखल केले, त्यावेळी तो वेड्यासारखा करायचा. त्याच्या डोक्‍यावर गंभीर स्वरूपाची जखमही होती. संस्थेने त्याच्यावर उपचार करीत मानसोपचारतज्ज्ञाच्या मदतीने सांभाळले. समुपदेशन, योग, प्राणायाम आणि ध्यानसाधनेवर भर दिला. काही दिवसांतच तो सामान्यांप्रमाणे वागू लागला. शेवटच्या टप्प्यात तो केंद्रातील अन्य सदस्यांना सांभाळू लागला. बुधवारी वडील सुरेश नंदेश्वर हे सुधरलेल्या मुलाला घेण्यासाठी केंद्रात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. तर, सिद्धार्थच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. 
 

कुणीही जन्मापासून गुन्हेगार नसतो. परिस्थितीमुळे तो गुन्हेगार होतो. त्या व्यक्‍तीला पुन्हा सामाजिक जीवन जगण्यास सक्षम करता येते. अंगावर खाकी वर्दी चढविली तरी मन, भावना या असतातच. त्यामुळे सिद्धार्थला सुधरण्याची संधी दिली. त्यानेही आमचा प्रयत्न सार्थक ठरविला. 
-संतोष खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अजनी पोलिस ठाणे 

go to top