भयंकर! आणखी चार रुग्णांची भर; एकूण कोरोना पॉझिटिव्ह 63

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

मेयो प्रयोगशाळेने नागपूर जिल्ह्यातील 65 नमुने तपासण्यात आले आहेत. यात 52 नमुने आमदार निवास येथील तर उर्वरित 13 भंडारा जिल्ह्यातील होते. यातील चार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सतरंजीपुरा येथील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते.

नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी ही उपराजनाधीसाठी चिंताजनक बाब आहे. शनिवारी आमदार निवास येथे विलगीकरणात असलेल्या चार कोरोना संशयीतांचा अहवाल मेयो प्रयोगशाळेतून आला. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपूरकरांची चिंता आनखीणच वाढली आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 63 झाली आहे. 

एक दिवसाची उसंत मिळाल्यानंतर नागपुरात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अचानक चार नमुने कोरोनाबाधित आल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. शहरात अखिल भरतीय आयुर्विज्ञान संस्था, मेडिकल व मेयो येथील प्रयोगशाळेत कोरोनाचे नमुने तपासण्यात येत आहेत. या नामुन्यांमध्ये विदर्भातील नमुन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - ... तरीही "झूम ऍप'च्या युजर्समध्ये वाढ

मेयो प्रयोगशाळेने नागपूर जिल्ह्यातील 65 नमुने तपासण्यात आले आहेत. यात 52 नमुने आमदार निवास येथील तर उर्वरित 13 भंडारा जिल्ह्यातील होते. यातील चार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सतरंजीपुरा येथील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. शनिवारी आलेल्या अहवालात एक महिला आणि तीन पुरुषांना कोरोना असल्याची बाब पुढे आली आहे. 

या वस्त्या प्रथमच कोरोनाच्या नकाशावर

आतापर्यंत सतरंजीपुरा, मोमीनपुरा, खामला, जरिपटका येथील संक्रमित व्यक्ती कोरोनाच्या नकाशावर झळकत होत्या. या वस्त्यांमधूनच बाधितांची संख्या वाढत गेली. मात्र, लॉकडाउनच्या 23 व्या दिवशी "कन्हान' आणि "गिट्टीखदान' हे दोन्ही भाग प्रथमच कोरोनाच्या नकाशावर आले. यामुळे ही बाब प्रशासनासाठी चिंता वाढवणारी आहे. तातडीने प्रशासनाने विलगीकरणापुर्वी या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली. त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहचून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल. कोरोना चाचणी केली जाईल. 

उपराजधानीत कोरोनाचा मृत्यूदर नियंत्रणात

क्रिकेटच्या खेळात बॅटने चेंडू टोलवल्यानंतर निघणाऱ्या रनप्रमाणे कोरोनाचे आकडे वाढत आहे. मात्र, शासन व प्रशासनाचे प्रयत्न मेयो आणि मेडिकलमधील उपचार यंत्रणेने दाखवलेल्या सजगतेमुळे शहरातील कोरोनाचा मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. उपराजधानीत साडेतीन हजारांपेक्षा अधिक नमुने तपासले. यात आतापर्यंत 63 बाधित आढळले. विशेष असे की, एका 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू वगळता 25 टक्के व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. याशिवाय मेयो मेडिकलमध्ये भरती असलेल्या 44 जणांची प्रकृती स्थिर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now 63 Corona positive in Nagpur