कोरोनाच्या धसक्‍याने अकरावी प्रवेशाबाबत घेण्यात आला हा मोठा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो. 

नागपूर : राज्यात पाच शहरात राबविण्यात येणाऱ्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदा ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज आणि शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावयाचे असल्याचे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. 

शहरातील 190 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 58 हजार 240 जागांचा समावेश आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्यात लागतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशास जून महिन्यात सुरुवात होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो. 

अधिक माहितीसाठी - दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...
 

निकालानंतर अर्जाचा दुसरा टप्पा भरण्यात येतो. यानंतर समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशाची यादी टक्‍केवारीच्या आधारावर प्रकाशित करून महाविद्यालयांना जागेचे अलॉटमेंट करण्यात येते. राज्यभरात दहावीसाठी जवळपास 16 लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. यापैकी जवळपास 75 ते 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. राज्यभरातील दोन हजारांवर महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. 

राज्यात कोरोनाचे सावट गडद असल्याने जुलै महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल लावण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी शिक्षण विभागाने अकरावीचे पाच शहरातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले. महत्त्वाचे म्हणजे यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रांवरून माहिती पुस्तकांच्या विक्रीची मुभा न देता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती पुस्तिका बघून अर्ज भरावयाचा आहे. यासाठी ऑनलाइन शुल्कच भरावे लागणार आहे. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना बघण्यासाठी केवळ पाच माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. साधारणत: दहावीचा निकाल लागल्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. 
 
असे आहेत बदल 

  • मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) 16 टक्‍क्‍यांऐवजी 12 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार. 
  •  अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के राखीव जागांऐवजी चार टक्के जागांचा समावेश 
  • द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील 
  • यातील रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना वा प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत प्राधान्य 
  • नियमित फेरीनंतर आवश्‍यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या घेण्यात येतील 
  • विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now everything is online in the eleventh admission