अबब! ‘माया’ झाली १२ बछड्यांची माय!!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

मार्च महिन्यात ही वाघीण बछड्यांसह दृष्टिपथास आली होती. मायाने सलग चौथ्यांदा बछड्यांना जन्म दिल्याची माहिती पुढे आली आहे. माया आतापर्यंत १२  बछड्यांची माय झाली आहे, हे विशेष.

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या ‘माया’(टी 12) वाघिणीने पुन्हा एकदा पाच बछड्यांना जन्म दिला आहे. ती बछडे तीन महिन्यांची आहेत. मार्च महिन्यात ही वाघीण बछड्यांसह दृष्टिपथास आली होती. मायाने सलग चौथ्यांदा बछड्यांना जन्म दिल्याची माहिती पुढे आली आहे. माया आतापर्यंत १२  बछड्यांची माय झाली आहे, हे विशेष.

 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनासाठी प्रकल्प बंद असल्याने बछडे पर्यटकांना दिसले नसले  तरी त्यांची नोंद झालेली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर १८ मार्चपासून  ताडोबा-अंधारीसह देशातील सर्वच व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. त्या  दरम्यानच "माया' बछड्यांसह ताडोबाच्या ‘बफर’क्षेत्रात दिसली होती.

 

ताडोबामधील ‘मटकासुर’ हा वाघ तिचा जोडीदार आहे. माया वाघिणीने बछड्याला जन्म  देण्याची ही चौथी वेळ आहे. २०१८ मध्ये तिने तिसऱ्यांदा बछड्याला जन्म दिला होता.  यापूर्वी मायाने दोन बछड्यांना जन्म दिला होता. मात्र, काही जंगली कुत्र्यांनी हल्ला  केल्याने ते बछडे दगावले होते.

हेही वाचा : नागपूरकरांनो सावधान! चोरटे पुन्हा आले फॉर्ममध्ये

आतापर्यंत मायाने १२ बछड्यांना जन्म दिलेला आहे. तिला पहिले बछडे ‘गब्बर’या  वाघापासून झाले होते. त्यानंतर २०१५ मध्ये ‘नामदेव’ तर तिसऱ्यांदा ‘मटकासुर’ या  वाघापासून बछडे झाले. ताडोबामध्ये या वाघिणीने प्रथमच पाच बछड्यांना जन्म दिला  आहे. पर्यटनाचे आकर्षण ठरलेल्या या वाघिणीचा फोटो डाक विभागाने पोस्टाच्या टपाल  तिकिटावर प्रकाशित केलेला आहे.

सद्यस्थितीत वाघीण आणि बछड्यांची संख्या : राज्य
कोल्लारवली- सात बछडे : मध्य प्रदेश
माधुरी- पाच बछडे : महाराष्ट्र अगरझरी (चंद्रपूर)
चांदी- पाच बछडे : उमरेड-कऱ्हांडला (नागपूर)
कॅटरिना- चार बछडे : बोर व्याघ्रप्रकल्प (वर्धा)
माया- चार बछडे : ताडोबा (चंद्रपूर)  

माया वाघिणीला बछडे झालेले आहेत. हे सत्य असले, तरी बछडे किती झाले, याविषयी आत्ताच सांगणे जरा जास्तच घाईचे ठरेल.

एन. आर. प्रवीण,
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now Maya is mother of twelve cubs