लुटेरी दुल्हन प्रीती दास प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे !

अनिल कांबळे
शनिवार, 20 जून 2020

प्रीती दास प्रकरणाचा तपास थेट गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी तिला स्थानिक पोलिस अधिकारी वाचवित होते. मात्र, गुन्हे शाखेकडे तपास गेल्यामुळे प्रीती दास प्रकरण आता "बाराच्या भावात' जाणार असल्याची चर्चा आहे.

नागपूर : शहरातील बहुचर्चित "चाची 420' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासवर एकापाठोपाठ एक फसवणूकीचे गुन्हे दाखल होत असल्याने पोलिस आयुक्‍तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आता प्रीती दास प्रकरणाचा तपास थेट गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी तिला स्थानिक पोलिस अधिकारी वाचवित होते. मात्र, गुन्हे शाखेकडे तपास गेल्यामुळे प्रीती दास प्रकरण आता "बाराच्या भावात' जाणार असल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती दासने गुड्‌डू तिवारी या युवकाला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून तब्बल 14 लाख रूपये उकळले. गुड्डूला तिचे अन्य काही पोलिस अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्याला कळले. त्याने अन्य पुरूषांशी मैत्री संबंध ठेवण्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे प्रीतीने चिडून त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवविण्याची धमकी दिली. तसेच पैसेही परत करण्यास नकार दिला. त्यामुळे गुड्‌डू तिवारीने पाचपावली पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लगेच प्रीतीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

यानंतर लकडगंजमध्ये राहणाऱ्या पौनीकर नावाच्या युवकाकडून पैसे वसुली करण्यासाठी प्रीती दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह त्याच्या घरी गेली होती. "तुझ्या पत्नीला धंद्यावर बसवून पैसे वसूल करेन' अशी धमकी दिल्यामुळे पौनीकरने आत्महत्या केली. या प्रकरणी लकडगंज ठाणेदाराकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार दिल्यानंतरही कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतु, पौनीकर यांची पत्नी पोलिस आयुक्‍तांकडे गेली. तिने लकडगंज पोलिस प्रीतीला कसे पाठीशी घालत असल्याचे सांगितले. पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानंतर लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी प्रीती व दोन साथिदारांविरूद्ध पौनीकरला आत्महत्येस प्रवृत्त ककेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

तसेच काही दिवसांपूर्वी सीताबर्डी पोलिस ठाण्यात एका उच्चशिक्षित युवतीने प्रीती दासने दीड लाखांची फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज दिला होता. परंतु, सीताबर्डी पोलिसांनी प्रीतीविरूद्ध गुन्हा दाखल केला नव्हता. 

वायुसेनेतील एका अधिकाऱ्याची त्यांच्या पत्नीने भरोसा सेलमध्ये दाखल तक्रारीसंदर्भात प्रीतीने भेट घेतली. आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्याकडून पोलिस निरीक्षक शुभदा संख्ये यांचे नाव सांगून 25 हजार रूपये उकळले. या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात प्रीती दासवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रीतीवर असे अनेक गुन्हे दाखल होत असल्यामुळे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रीती दास प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे.

सविस्तर वाचा - नागपुरात कोरोना सुसाट

पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
प्रीतीशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांच्या छातीचे ठोके वाढले आहेत. प्रीतीला मदत करण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता गुन्हे शाखा प्रीतीच्या मोबाईलचा सीडीआर काढून भंडाफोड करणार याची कल्पना असल्यामुळे अनेकांनी धावपळ करणे सुरू केल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Preeti Das Case over to Crime Branch