वाघ साहेबांनाही आता कृत्रिम पाय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

कृत्रिम पाय लावण्यासाठी आवश्‍यक असलेले वाघाच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले होते. आता त्या वाघाच्या पायाची जखम भरली असून कृत्रिम पायही तयार झालेला आहे. त्याची चाचणी संगणकाच्या माध्यमातून घेण्यात येईल. पशुवैद्यकीय डॉक्‍टरांची चमू हा पाय लावण्यासाठी तयार आहेत. 18 जानेवारीचा मुहूर्त पाय लावण्यासाठी निश्‍चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर : थायलंडमध्ये हत्तीला कृत्रिम पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. याच धर्तीवर गोरेवाडा बचाव केंद्रातील पायाची बोटे गमावलेल्या "साहेबराव' या वाघाला 18 जानेवारीला कृत्रिम पाय बसवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांना यश आल्यास वाघाला कृत्रिम पाय बसवण्याचा हा भारतातील पहिला प्रयोग ठरेल. दिल्लीहून एका वाघाचे रक्त आणून ते वाघिणीला देण्याचा भारतातील पहिला प्रयोग महाराजबाग प्राणिसंग्रहालयातच झाला होता हे विशेष.

सविस्तर वाचा - पर्यटकाला वाघिणीचा आवाज काढणे पडले महागात

बहेलिया शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकल्यामुळे महाराजबाग प्राणिसंग्रहालयात उपचारासाठी आलेल्या "साहेबराव' या वाघाच्या पायाची बोटे कापावी लागली. दोन वर्षांपूर्वी त्याची रवानगी गोरेवाडा बचाव केंद्रात झाली. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत या आठ वर्षीय वाघाला डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी दत्तक घेतले. दत्तक घेतल्यानंतर वाघाला कृत्रिम पाय लावण्याचा चंग बांधला. थायलंडमध्ये त्यांच्या एका मित्राने पायात समस्या असणाऱ्या हत्तीला दत्तक घेतले होते. त्या हत्तीला कृत्रिम पाय बसवून त्याला चालण्यास सक्षम केले. डॉ. बाभूळकर यांनीही "साहेबराव'ला नीट चालता यावे म्हणून त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. गोरेवाडा प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार क्ष-किरण व इतर वैद्यकीय तपासणीसह मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमविण्यासाठी न्युरोमा व संधिवातापासून आराम मिळण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, कृत्रिम पाय लावण्यासाठी आवश्‍यक असलेले वाघाच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले होते. आता त्या वाघाच्या पायाची जखम भरली असून कृत्रिम पायही तयार झालेला आहे. त्याची चाचणी संगणकाच्या माध्यमातून घेण्यात येईल. पशुवैद्यकीय डॉक्‍टरांची चमू हा पाय लावण्यासाठी तयार आहेत. 18 जानेवारीचा मुहूर्त पाय लावण्यासाठी निश्‍चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही शस्त्रक्रिया पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. गौतम भोजने, डॉ. विनोद धूत हे करणार आहेत. तसेच चालण्याचे चित्रीकरण करून तो कसा चालतो हे पाहिले जाईल. गाय किंवा हत्ती यांना कृत्रिम पाय लावला तर ते लवकर स्वीकारतात. वाघाच्या बाबतीत थोडे कठीण आहे, कारण ते काढून फेकू शकतात. त्याने कृत्रिम पाय स्वीकारला नाही तरी त्याला चालताना होणारा त्रास नाहीसा करणे, हे आमचे ध्येय आहे. त्याचे दु:ख कमी झाले तर तो पायावर भर देऊ शकेल आणि व्यवस्थित चालू शकेल असा विश्‍वास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now tiger will have Jaipur foot