वंध्यत्वाला कारणीभुत आजची जीवनशैली आणि ताणतणाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

स्थूलपणामुळे पुरुषांमध्ये शुक्राणू आणि स्त्रियांमध्ये बिजांडांची क्षमताही काही प्रमाणात प्रभावित होते. विशेष असे की बदललेली जीवनशैली, आयुष्यातील ताणतणाव, मद्यपान, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचाही परिणाम होतो.

नागपूर : मूल होण्याची तीव्र इच्छा असूनही विविध कारणांमुळे पालकत्वाचा आनंद घेऊ न शकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
अंडकोषातून स्त्रीबीज बाहेर न पडणे म्हणजेच "पीसीओएस' नावाचा आजारासह लठ्ठपणा हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे प्रमुख कारण ठरत आहे, असा दावा स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच फॉग्सी या राष्ट्रीय संघटनेचे महासचिव डॉ. जयदीप टांक यांनी आज येथे केले.

सविस्तर वाचा - अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

नागपुरातील स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना तसेच श्रीखंडे हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, फेमिकेअर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी "वंध्यत्व' या विषयावर मास्टरक्‍लास राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी डॉ. टांक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. लक्ष्मी श्रीखंडे उपस्थित होत्या. डॉ. टांक म्हणाले, की स्थूलपणामुळे पुरुषांमध्ये शुक्राणू आणि स्त्रियांमध्ये बिजांडांची क्षमताही काही प्रमाणात प्रभावित होते. विशेष असे की बदललेली जीवनशैली, आयुष्यातील ताणतणाव, मद्यपान, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचाही परिणाम होतो. अलीकडे प्रसूतीत सिझेरियनचा टक्का प्रचंड वाढला आहे, अशी चर्चा वैद्यक क्षेत्रात आहे. मात्र प्रत्यक्षात सिझेरियन देशात वाढल्याचा दावाच खोटा आहे. देशात केवळ 12 ते 13 टक्के प्रसूती खासगी रुग्णालयांत सिझेरियनने झाल्याचे आरोग्य विभागाचे आकडे सांगत असल्याचाही दावा डॉ. टांक यांनी केला. जागतिक आरोग्य संघटनेनेही प्रसूतीदरम्यान महिलांची स्थिती व गुंतागुंत बघूनच सिझेरियन करावे की नाही, हा निर्णय रुग्णाला विश्वासात घेऊन डॉक्‍टरांनी करण्याबाबत सांगितले आहे. सध्या महिलांना प्रसूती कळा सुरू झाल्यावर विशिष्ट काळात प्रसूती न झाल्यास त्यानंतर गुंतागुंतीची शक्‍यता बघता सिझेरियनला प्राधान्य दिले जाते. शहरात टर्शरी केअर केंद्रात गंभीर संवर्गातील प्रसूतीसाठीच्या महिला येत असल्याने येथे सिझेरियनची संख्या थोडी जास्त दिसत असल्याचेही डॉ. टांक यांनी सांगितले.

डॉ. लक्ष्मी श्रीखंडे म्हणाल्या, आजच्या जीवनशैलीमुळे पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरात अंतर्बाह्य बदल होत आहेत. त्यामुळे वंध्यत्वाला दोघेही समप्रमाणात जबाबदार ठरत आहेत. डॉ. कामिनी पटेल, डॉ. अरुण राठी, डॉ. मनोज आगलावे, डॉ. राजसी सेनगुप्ता, डॉ. वैदेही मराठे, डॉ. अरुण राठी, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सांदीपनी खडे, डॉ. जे. फिदवि, डॉ. दर्शन पवार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. शिल्पी सूद यांनी यांनीही कार्यशाळेत विविध विषयांवर प्रकाश टाकला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obesity is responsible for sterility