नागपूर जिल्ह्यात तयार होणार ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू

नरेंद्र चोरे
Monday, 7 September 2020

नागपूर जिल्ह्यात तीन खेळांचे केंद्र राहणार आहे. नागपुरात शासनाकडे अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण, मुष्टियुद्ध आणि कुस्ती या पाच खेळांची मागणी करण्यात आली असून, यातील तीन खेळांचे प्रशिक्षण केंद्र नागपूरला मिळणार आल्याची माहिती, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांनी दिली.

नागपूर  : छोट्या शहरांमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत आणि ऑलिंपिकमध्ये भारताची वैयक्तिक व सांघिक प्रकारातील कामगिरी सुधारावी, या उद्देशाने देशभरात जिल्हा पातळीवर आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातही तीन केंद्र होणार आहे. या केंद्रांमध्ये तज्ञ प्रशिक्षकांमार्फत युवा खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना भविष्यातील ऑलिंपिकसाठी तयार केले जाणार आहेत. 

ऑलिंपिकमध्ये भारताच्या कामगिरीत सुधारणा व्हावी तसेच अधिकाधिक पदके मिळावी, यासाठी केंद्र शासनाने हे महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या अंतर्गत केंद्र शासनाच्या 'खेलो इंडिया' योजनेतून देशभरात जवळपास एक हजार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यातील तीन प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यात राहणार आहे. भारत सरकारच्या प्रादेशिक संचालक आणि 'खेलो इंडिया' युवक क्रीडा मंत्रालयाकडून ही योजना राबविली जाणार आहे. 

 

हेही वाचा : कसे मिळणार अल्प मानधनात चांगले प्रशिक्षक? 
 

पहिल्या टप्प्यासाठी मुष्टियुद्ध, बॅडमिंटन, हॉकी, जलतरण, नेमबाजी, फुटबॉल, भारोत्तोलन, टेबल टेनिस, धनुर्विद्या, तलवारबाजीसह एकूण १४ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने पायाभूत क्रीडा सुविधा असणाऱ्या ठिकाणीच ही केंद्रे राहणार आहेत. नागपूर जिल्ह्यात तीन खेळांचे केंद्र राहणार आहे. नागपुरात शासनाकडे अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण, मुष्टियुद्ध आणि कुस्ती या पाच खेळांची मागणी करण्यात आली असून, यातील तीन खेळांचे प्रशिक्षण केंद्र नागपूरला मिळणार आल्याची माहिती, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांनी दिली. यात प्रशिक्षणासाठी १५ पुरुष व तेवढ्याच महिला खेळाडूंची निवड विविध जिल्हा संघटनेमार्फत त्यांच्या कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. त्यांना स्थानिक अनुभवी प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. या प्रशिक्षकांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. 

यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हे केंद्र तातडीने सुरू होणार असल्याने, खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आल्याचे पुंड यांनी सांगितले. या केंद्रांवर अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडूनही दरवर्षी पाच लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. 

केंद्र शासनाचा हा उपक्रम अतिशय चांगला असून, त्यामुळे छोट्या शहरांमधील युवा खेळाडूंनाही अद्ययावत प्रशिक्षण मिळणार आहे. यात प्रशिक्षण घेणारे खेळाडू चार वर्षांनंतर होणाऱ्या ऑलिंपिकसाठी सज्ज होतील, अशी अपेक्षा आहे. 
-अविनाश पुंड, जिल्हा क्रीडाधिकारी 

संपादन : नरेश शेळके 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Olympic level Athletes Will Come From Nagpur district