लॉकडाऊनमध्ये योगासनेही ऑनलाईन, आंतरराष्ट्रीय योगदिनाची जय्यत तयारी

yoga
yoga

नागपूर : कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना बाहेर जाऊन व्यायाम, योगा करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अनेक योग संस्था ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना योगासने करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्याविषयी जनजागृती व रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी नागसिन्धु बहुउद्देशीय संस्था, युवा जनकल्याण संघटन , व सूर्या फाउंडेशनच्या वतीने नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागात नागरिकांना योग शिकवल्या जात आहे.

21 जून योगदिनानिमित्त सूर्य फाउंडेशनद्वारे देशभरातील जनतेला ऑनलाईन जोडून हा योगासनांचा कार्यक्रम राबविला जाणार आहे, यात 18 राज्यातील 85 जिल्ह्यांमधील 600 गावांमध्ये 60 हजार कुटूंबीय व 600 योगशिक्षक व को-ऑर्डिनटर सहभागी होणार आहेत. याकरिता 1 जूनपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली होती. नागसिन्धु संस्थेच्या अध्यक्षा चॉंदसी मेश्राम व युवा जनकल्याण अध्यक्ष श्रीकांत पारधी यांच्या मार्गदशनामध्ये नागपूर व नागपूर ग्रामीण भागात योग शिक्षकांमार्फत विविध योगासने शिकविण्यात येत आहेत.

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग अत्यंत आवश्‍यक आहे. लॉकडाऊनच्या काळात, मानसिक, भावनिक, आर्थिक अशा चौफेर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, प्रत्येकाला योगासनांचा फायदा होणार आहे. ऑनलाइन वर्गांचा फायदा घेऊन, घरच्या घरी प्रशिक्षीत योग शिक्षकांच्या मार्गदर्शनात नियमित योगासने केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योगासने हा नक्कीच चांगला उपाय आहे.

काय आहेत योगासनांचे फायदे

  • ताणतणावपासून मुक्ती - व्यस्त जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगासने केल्यास, या ताणतणावपासून मुक्ती मिळू शकते. रोज प्राणायाम आणि ध्यान करीत असाल तर संपूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि उत्साह कायम राहतो.
  • शरीरातील साखरेवर नियंत्रण - आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह होतो. शरीरातील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योग केल्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी - आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्‍या बदलल्या आहेत की, परिणामी वजन वाढते. बऱ्याच जणांना ही समस्या असते. योगा केल्यामुळे वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे पचनक्रिया योग्य राहते आणि शरीरामध्ये चरबी साठत नाही.
  • रक्ताभिसरण चांगलं होतं - योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तऱ्हेने होतो आणि रक्ताभिसरण चांगले होते.
  • म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी - तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर योगासने करीत असाल तर म्हातारपणात आरोग्याच्या समस्या कमी येतात.

आंतरराष्ट्रीय योग दिन
दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भारताबरोबरच जगभरात अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीमध्ये योग्य संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथातही केलेली आढळते. भारतात जवळपास 5000 वर्ष पुरातन अशा आध्यात्मिक प्रथेच्या रूपात योग स्वीकारण्यात आला आहे. योगाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली होती असे सांगण्यात येते त्यावेळी लोक आपला शारीरिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी ध्यानधारणा करत होते.

ऑनलाईन नोंदणी
जागतिक योग दिनाच्या पूर्वतयारीसाठी आम्ही देशभरात 1 जूनपासून ऑनलाइन योग उपक्रम सुरू केला आहे. यासाठी नागपूरातील 500 कुटुंबातील सदस्यांची मोफत ऑनलाईन नोंदणी केली असून, यामार्फत रोज सकाळी सात ते आठ आणि सायंकाळी पाच ते सहा यावेळेत योगासनांचे प्रशिक्षण दिले जाते. जागतिक योग दिनाला हा संपूर्ण उपक्रमाला जागतिक स्तरावर एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे.
चॉंदसी मेश्राम, अध्यक्षा, नागसिंधु संस्था, नागपूर.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com