कोविडग्रस्तांना शेवटच्या तासात संधी; पदवीधर निवडणूक

नीलेश डोये
Monday, 30 November 2020

निवडणूक आयोगाने नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे. ३२२ केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरोनासंदर्भातील सूचनांचे पालन करून मतदारसंघ निश्चित केले आहे.

नागपूर : मंगळवारी (एक डिसेंबर) होणाऱ्या पदवीधर मतदानाच्या दिवशी मतदारांचे नाव शोधण्यासाठी जाणारा वेळ लक्षात घेता मतदानाच्या एक दिवस आधी शहरात महानगरपालिकेच्या वतीने दहा झोननिहाय मतदान केंद्रांवर संगणक व टॅबसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशीही केंद्र सुरू असेल, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी झोनमधील मतदान केंद्रावर कर्मचारी मतदाराला त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करतील. नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याची एक दिवस आधीच माहिती करून घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

निवडणूक आयोगाने नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे. ३२२ केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरोनासंदर्भातील सूचनांचे पालन करून मतदारसंघ निश्चित केले आहे. नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यात १६४, भंडारा ३१, गोंदिया २१, वर्धा ३५, चंद्रपूर ५०, तर गडचिरोली जिल्ह्यात २१ मतदान केंद्र आहे.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

पदवीधरांनो, मतदान करा

लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी एक डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले. कोरोना सुरक्षा मानकानुसार पदवीधर निवडणूक घेण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून निवडणुकीचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. विभागात दोन लाख सहा हजार मतदार असून, त्यापैकी एक लाख १० हजार मतदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. कोविडग्रस्तांना शेवटच्या तासात संधी देण्यात येणार आहे.

जिल्हा   मतदान केंद्र मतदार
नागपूर १६४ १,०२,८०९
भंडारा ३१ १८,४३४ 
गोंदिया २१ १६,९३४
वर्धा ३५ २३,०६८
चंद्रपूर ५० ३२,७६१ 
गडचिरोली २१ १२,४४८

 संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for covid victims in the last hour