esakal | प्रेरणादायी... दृष्टिहीन, तरीही स्वीकारला हॉस्टेलचा पर्याय; अन्‌ गाठले अव्वल यश... 
sakal

बोलून बातमी शोधा

Overcoming blindness, Himanshu scored 90% marks

शहरातील बंगाली पंजा या दाट वस्तीत राहणाऱ्या हिमांशूचा घरी अभ्यास होत नव्हता. घरी सतत टीव्ही व येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या गदारोळामुळे त्याने घरच्यांना इयत्ता आठवीतच होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय कळवला. घरच्यांनीही तो निर्णय मान्य केला. हिमांशू शाळेतील सर्वसाधारण मुलांमध्येच राहून शिकला.

प्रेरणादायी... दृष्टिहीन, तरीही स्वीकारला हॉस्टेलचा पर्याय; अन्‌ गाठले अव्वल यश... 

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : काही मुलांमध्ये उपजतच काही गुण असतात. वाढत्या वयानुसार त्यांच्यातील ते खासपण वाढत जाते. मग परिस्थिती कशीही असू दे, त्यावर मात करीत हे विद्यार्थी यश मिळवितातच. हिमांशूची गणनाही अशाच जिद्दी आणि चिकाटी असलेल्या मुलांमध्ये होते. बेताची आर्थिक परिस्थिती, जन्मापासूनच मिळालेले 75 टक्‍के अंधत्व या गोष्टी त्याने कधीही स्वत:वर डोईजड होऊ दिल्या नाही. घरी अभ्यासात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे अंध असूनही त्याने हॉस्टेलचा पर्याय स्वीकारला आणि हे घवघवीत यश मिळविले. 

शहरातील बंगाली पंजा या दाट वस्तीत राहणाऱ्या हिमांशूचा घरी अभ्यास होत नव्हता. घरी सतत टीव्ही व येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या गदारोळामुळे त्याने घरच्यांना इयत्ता आठवीतच होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय कळवला. घरच्यांनीही तो निर्णय मान्य केला. हिमांशू शाळेतील सर्वसाधारण मुलांमध्येच राहून शिकला. होस्टेलमध्ये राहून शिक्षकांच्या मदतीने त्याने अभ्यासाला सुरुवात केली. जन्मापासून दृष्टीहीन असलेल्या हिमांशूला सुरुवातीपासूनच अभ्यासाची गोडी होती. यात त्याला शिक्षकांसह त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनीही खूप मदत केली. त्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे असल्याचे हिमांशूने सांगितले. 

ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...
 

हिमांशूच्या घरची परिस्थिती फारकाही बरी नव्हतीच. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांनी ऑटो चालविण्यास सुरुवात केली. आठव्या वर्गापासून हिमांशू बोकडेने शाळेच्या होस्टेलचा आधार घेत, अभ्यासाला सुरुवात केली. जन्मापासूनच 75 टक्के दृष्टीहीन असलेल्या हिमांशूने आपल्या जिद्दीने अंधत्वावर मात करीत 90 टक्‍क्‍यांसह नेत्रदीपक यश मिळविले. तसेच दहावीच्या परीक्षेत दिव्यांगांमधून विदर्भात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. 

आयएएस अधिकारी व्हायचेय... 

हिमांशू बोकडेची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून येणाऱ्या हिमांशूला भविष्यात आयएएस अधिकारी होऊन समाजसेवा करायची आहे. त्यासाठी मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे. हिमांशू महाराष्ट्रातून दुसरा येण्याचा दावा कुर्वेज मॉर्डन शाळेने केला आहे. 

रात्रशाळेत शिकून हर्षलने मिळविले यश 


नागपूर : प्रतिकूल परिस्थिती, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, आई आजाराने ग्रासलेली. त्यामुळे शिक्षणावर गदा येईल असे वाटू लागले. मात्र, मनात शिकण्याची इच्छा, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्याने प्रतिकूल परिस्थितीला आत्मविश्‍वासाने सामोरे जात हर्षलने दिवसा काम करीत रात्रशाळेत शिकून दहावीमध्ये 65 टक्के गुण मिळवले. हर्षलचे वडील सुरक्षा रक्षक असून, आई अनेक वर्षांपासून आजारी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने घरचा सगळा भार एकटा हर्षलवर आला. काही वर्षांआधी त्याने नियमित शाळेत जाण्याचा विचार केला. मात्र, हर्षलची परिवाराचा गाडा ओढताना तारांबळ उडायची. परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या हर्षलने एका खासगी कंपनीत काम सुरू केले. सकाळी आठ ते दुपारी साडेचारपर्यंत काम करायचे. त्यानंतर साडेसहा वाजता रात्रशाळेत जायचे. शाळेतला अभ्यास पूर्ण कारण्यासाठी पुन्हा रात्री एकपर्यंत जागरण करायचे, असा दिनक्रम ठरलेला. कंपनीत कामाला असल्याने घरी थोडा आर्थिक आधार व्हायचा. त्यामुळे घरून विरोध कधी झालाच नाही. हर्षलने मेहनत करून रात्रशाळेतून कठोर परिश्रमाच्या जोरावर दहावीमध्ये चांगले यश मिळविले. हर्षल शिकत असलेल्या संत गाडगे महाराज रात्रशाळेचा निकाल 94.73 टक्के लागला. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव उदय मोगलेवार, अध्यक्ष डॉ. आरती मोगलेवार आणि मुख्याध्यापक सुनील ठाणेकर यांनी अभिनंदन केले.