
गुमगाव (जि. नागपूर) : येथील वेणा नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, दोन वर्षांनंतरही पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून पुलाचे बांधकाम थंडबस्त्यात गेले आहे. सध्या अर्धवट पुलामुळे परिसरातील पर्यायी रस्त्यांवरील दिवसेंदिवस जडवाहतुकीचे ‘ओझे’ वाढत असून जडवाहतुकीने रस्त्याची पुरती ‘वाट’ लागली आहे. पर्यायी रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ, खडी, कर्णकर्कश हॉर्नचा आवाज यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गुमगाव-डोंगरगाव मार्गावरील वेणा नदीवर १० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाच्या बांधकामाचे २१ डिसेंबर २०१८ रोजी आमदार समीर मेघे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मोठ्या जोमात सुरू करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम सध्या थंडबस्त्यात गेल्याने नागरिक कमालीचे संतापले आहेत.
अर्धवट पुलामुळे वाहनचालकांना नाईलाजास्तव हिंगणा, नागपूर आणि बुटीबोरीकडे जाण्यासाठी धानोली, कोतेवाडा, सालईदाभा, वडगाव-गुजर आणि अमरावती-जबलपूर महामार्गासारख्या पर्यायी, परंतू दूरच्या मार्गावरून निष्कारण प्रवास करावा लागत आहे.
अर्धवट पुलामुळे वाहनांच्या वर्दळीने पर्यायी मार्गावरचे ओझे दिवसेंदिवस वाढत असून पुलालगतचा वळणमार्ग धोक्याचा झाला आहे. धानोली, वडगाव-गुजर, सालईदाभा मार्गावर समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान २४ तास सुरू असलेली जडवाहतुक वाहनचालकांच्या हृदयात धडकी भरविल्याशिवाय राहत नाही.
सोबतच अमरावती-जबलपूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामादारम्यान वाहनांची 'स्पीड' दिवसेंदिवस अपघाताला कारणीभूत ठरत आहे. पुलाचे काम गतीने झाले असते तर ही वेळचं आली नसती, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
बांधकाम ताबडतोब सुरू करा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार समीर मेघे यांच्या अथक प्रयत्नाने गुमगाव येथील वेणा नदीवर १० कोटी रुपयांच्या पुलाच्या बांधकामाला गतीने सुरुवात करण्यात आली. परंतु, सध्या महाविकासआघाडी सरकारच्या काळात पुलाच्या बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुलाचे बांधकाम ताबडतोब सुरू करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येईल.
- अक्षय सुभाषराव लोडे पाटील,
युवा सरपंच, वडगाव-गुजर
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.