अकोलेकरांनी ३७ वर्षांपूर्वी प्रथमच अनुभवला रणजी सामन्याचा थरार

नरेंद्र चोरे
गुरुवार, 4 जून 2020

यजमान म्हणून विदर्भाचे रणजी सामने आता फक्त नागपुरातच होत असले तरी १९८० च्या दशकात इतर जिल्ह्यातही सामने झाल्याची नोंद आहे. त्यापैकी एक सामना अकोला येथे झाला होता. प्रथमच रणजी सामना होत असल्याने प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. अशा या सामन्याविषयी एक गाजलेला सामना या मालिकेत...

नागपूर : विदर्भाचे रणजी सामने "याचि देही याचि डोळा' पाहण्याची संधी आतापर्यंत केवळ नागपूरकर प्रेक्षकांनाच मिळाली आहे असे नव्हे. क्वचित प्रसंगीच इतर जिल्ह्यांतील क्रिकेटप्रेमींना ते भाग्य लाभले आहे. अशीच एक सुवर्णसंधी 1983 मध्ये अकोलेकरांना विदर्भ-रेल्वे रणजी सामन्याच्या निमित्ताने मिळाली होती.

प्रेक्षकांच्या खचाखच उपस्थितीत खेळल्या गेलेल्या त्या लढतीत विदर्भाच्या खेळाडूंनी बलाढ्य रेल्वेच्या नाकीनऊ आणून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली होती. त्या सामन्यात पहिल्या डावाच्या आधारावर रेल्वेने बाजी अवश्‍य मारली, पण चर्चा मात्र वैदर्भी खेळाडूंचीच झाली. प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना विदर्भाचे कर्णधार सुहास फडकर आणि रेल्वेचे पी. वेदराज यांच्या संघांत झाला होता. रेल्वे संघात अल्फ्रेड बुरोज, नरेश चुरी, प्रवीण करकेरा, हर्ष माथूरसह वेगवान गोलंदाज अस्लम अली व प्रदीप बॅनर्जीसारखे नावाजलेले खेळाडू होते. विदर्भ संघात प्रसाद शेट्टी, हेमंत वसू, विकास गवते, अनिरुद्ध पालकर, सुनील हेडाऊ, प्रवीण हिंगणीकर, सतीश टकले, संजय जुगादेंसारखे धुरंधर होते. अकोला क्रिकेट क्‍लबच्या मैदानावरील "मॅटिन विकेट'वर रंगलेल्या तीनदिवसीय सामन्यात करकेरांच्या शतकी (113 धावा) खेळीच्या बळावर रेल्वेने 339 अशी चांगली धावसंख्या उभारली.

वाचा - विदर्भाने 37 वर्षांपूर्वी उदयपूरमध्ये केले होते राजस्थानचे गर्वहरण

मध्यमगती गोलंदाज टकले यांनी चार गडी बाद करून रेल्वेच्या धावसंख्येवर काही प्रमाणात अंकुश ठेवला. या धावसंख्येचा पाठलाग करताना विदर्भाने 31 धावांतच दोन गडी गमावले. मात्र, त्यानंतर शेट्टी यांनी घणाघाती प्रहार करून रेल्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी मैदानाच्या चारही बाजूंनी फटकेबाजी करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. दुर्दैवाने शेट्टी 58 धावांवर बाद झाले विदर्भाची उतरंडही घसरली. कर्णधार फडकर यांनी व गवते यांनी 31 धावांचे योगदान देत विदर्भाला दोनशेपार नेले. रेल्वेने विदर्भाचा डाव 215 धावांत गुंडाळून 124 धावांची आघाडी घेतली. निर्णायक विजय मिळवण्याच्या इराद्याने रेल्वेने दुसरा डाव 9 बाद 159 धावांवर घोषित करत विदर्भासमोर 280 धावांचे लक्ष्य ठेवले. सरतेशेवटी पाहुण्या संघाने घेतलेली "रिस्क' त्यांच्यावरच उलटणार होती.

आणखी वाचा - Video : अन्‌ वैदर्भी खेळाडूंच्या आनंदावर फिरले पाणी !

थोडक्‍यात हुकला विदर्भाचा विजय
"मॅटिन विकेट'वर चौथ्या डावात 280 धावा काढने खूपच कठीण होतं. मात्र, या सामन्यात गमावण्यासारखं काहीही नसल्याने विदर्भाने ते धाडस केले. सुदैवाने शेट्टी-हिंगणीकर जोडीने 43 धावांची चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मधल्या फळीतील पालकर, फडकर, पनकुले व हेडाऊ यांनीही धावा काढून विजयाच्या आशा उंचावल्या. शेवटच्या दिवशी विदर्भ विजयापासून अवघ्या 26 धावांनी दूर असताना षटके व वेळ संपल्याने विदर्भाचा विजय थोडक्‍यात हुकला. सहाव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या पालकर यांनी 64 धावा फटकावून रेल्वे खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळविले होते. विदर्भ जिंकणार, या अपेक्षेने शेवटच्या दिवशी मैदानावर तरुण-तरुणींसह हजारो क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. दुर्दैवाने संधी असूनही विदर्भ जिंकू न शकल्याने त्यांची निराशा झाली. पण, दोन दिग्गज संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीने ते निश्‍चितच सुखावले. वैदर्भी खेळाडूंच्या झुंझार प्रवृत्तीची कित्येक दिवसापर्यंत पंचक्रोशीत चर्चा होती.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People of Akola experienced the thrill of a Ranji match 37 years ago