esakal | Video भूख, प्यास की चिंता नही, बस गाव जाना हैं...
sakal

बोलून बातमी शोधा

People desperately trying to got at homeland

मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणावरून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेशातील मजूर नागपूरमार्गे मिळेल त्या वाहनाने किंवा मिळेल त्या मार्गाने स्वगृही परतण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Video भूख, प्यास की चिंता नही, बस गाव जाना हैं...

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : समाधानकारक दोन घास पोटात टाकणे, एवढेच स्वप्न घेऊन विविध राज्यांत रोजगारासाठी स्थिरावलेल्या मजुरांची घरी जाण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. शेकडो किमी अंतर पायी किंवा सायलकने कसेतरी पूर्ण करून नागपूरपर्यंत पोहोचलेले परप्रांतीय मजूर सध्या पुढे जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाची प्रतीक्षा करीत आहेत. गेल्या दीड महिन्याच्या लॉकडाउनमुळे जवळची पुंजी खर्च केली. आता खर्चाला दमडीही नसून पुढे कसे जायचे? असा प्रश्‍न काहींनी व्यक्त केला तर काहींच्या डोळ्यात प्रश्‍नांचा डोंगर उभा दिसून आला. "भूख, प्यास की चिंता नही, बस गाव जाना है, कुछ मिलेगा क्‍या' असे मिळेल त्याला विचारणाऱ्या परप्रांतीयांमुळे सरकार व व्यवस्थेचेही आज पुरते धिंडवडे निघाले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे काही दिवस आहे तेथेच काढल्यानंतर आता परप्रांतीय मजुरांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे विविध राज्यांतून स्वगृही परतण्यासाठी अनेक मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणावरून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेशातील मजूर नागपूरमार्गे मिळेल त्या वाहनाने किंवा मिळेल त्या मार्गाने स्वगृही परतण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यातील अनेक जण खापरी-भंडारा मार्गावरील टोलनाक्‍यावर आहेत. नागपुरातील हा टोलनाका देशातील या स्थलांतरणाचा साक्षीदार ठरला आहे. येथे परप्रांतीयांच्या विश्रांतीसाठी शेड तयार करण्यात आले असून त्यात एक वर्ष तर दहा वर्षाच्या मुलांसह अनेक महिला, पुरुष थांबले आहेत.

खाद्य पदार्थाकडे बोट दाखविणारे इवलेसे बोट अन्‌ ते खरीदीची क्षमता नसलेली लाचार आई या शेडमध्ये दिसून आली. कुणाचे मोबाईलमधील रिचार्ज संपुष्टात आल्याने घरच्या संपर्कासह धीर देणारा आधार तुटला. फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला असला तरी नागरिकांना घरी जात असल्याचा आनंद असल्याचे एका नागरिकाने सांगितले. तेलंगणातील जगदगिरी गुट्टा येथे काम करणाऱ्या व आता उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील स्वगृही जात असलेल्या विजय गुप्ता या तरुणाने संताप व्यक्‍त केला.

तेलंगणा सरकारने परप्रांतीयांची एकप्रकारे थट्टाच केल्याचे त्याने नमूद केले. रेल्वेचे पास दिले, परंतु रेल्वेच नसल्याने कसेतरी 52 दिवस काढले. आता संयम संपल्याने नागपूरपर्यंत कसेतरी आलो. येथून गोरखपूर येथे जाण्यासाठी कालपासून वाहनाचा शोध घेत असल्याचे विजय गुप्ता या तरुणाने सांगितले.

या कारणाने बंद होणार राज्यातील साडेचार हजार शाळा; शिक्षकांचे भविष्यही अधांतरी

पुणे-नगर, वर्धा-नागपूर पायपीट


पुणे येथून नगरपर्यंत पायपीट केली. औरंगाबादचा एक ट्रक मिळाला, त्याने वर्धेपर्यंत सोडले. वर्ध्यापासून पायपीट करीत आज सकाळी नागपुरातील या टोल नाक्‍यावर वाहन मिळेल, या अपेक्षेने थांबलो, असे उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील रफी उल्ला या तरुणाने सांगितले. पुण्यातील प्रशासनाने रेल्वेने जाण्यासाठी अर्ज भरण्यास सांगितले. तेही केले, परंतु काहीही फायदा झाला नाही, असेही या तरुणाने नमूद केले.

नागपूर ते फैजाबाद दोन हजार भाडे


लॉकडाउनमुळे पुण्यात बरेच दिवस गेले. मिळालेले वेतन पूर्ण खर्च झाले. अखेर पायीच निघालो, ट्रक मिळाला. नागपुरात आलो, नागपुरातून फैजाबाद येथे जाण्यासाठी ट्रकचालक दोन हजार रुपये भाडे मागत आहे, असे रफी उल्ला याने सांगितले. आता जवळ काहीच नाही, टोल नाक्‍यावरून कुणीतरी जाण्याची सुविधा करून देत असल्याने येथे आलो, असेही हॉटेलमध्ये काम करणारा रफी म्हणाला.

हैदराबाद ते नागपूर चारशे रुपये भाडे


हैदराबादवरून आज 50 मजूर या टोलनाक्‍यावर आले. यात 15 महिला तर एक ते दहा वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे बिहार येथील मुजफ्फरपूर येथील आहेत. हैदराबाद ते नागपूरपर्यंत प्रतिव्यक्ती चारशे रुपये भाडे दिल्याचे अनिलकुमार या तरुणाने सांगितले. केवळ लहान मुलांचे भाडे घेतले नाही. उत्तर प्रदेश सरकारही काहीच सोय करीत नसल्याचे अनिलकुमार म्हणाला.


हैदराबाद ते गोरखपूरकडे सायकलने प्रवास


खिशातील सर्व पैसे संपुष्टात येत होते. गावाला जाण्याकरिता काहीही मिळत नसल्याने शनिवारी दोन नवीन सायकली खरेदी केल्या अन्‌ गोरखपूर येथील गावाकडे प्रवास सुरू केल्याचे देवानंद याने सांगितले. महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सायकलने आलो, त्यानंतर ट्रकने प्रवास केला. आता येथून वाहन मिळाले तर ठीक, नाही तर सायकलने पुढे जाणार, असे त्याचाच मित्र असलेल्या अवथनाथ विश्‍वकर्माने सांगितले.


ट्रकमध्ये गुरांसारखे कोंबले मजूर


गंतव्य ठिकाणी घेऊन जाणारे ट्रक, 407 या वाहनांत जनावरे कोंबतात, तसे मजुरांना कोंबले असल्याचेही दिसून आले. शनिवारी भिवंडी येथून निघालेल्या 407 मध्ये 54 जणांना कोंबण्यात आले होते. तीन दिवसांपासून या लोकांचा प्रवास सुरू असून ते उत्तर प्रदेशातील इलाहाबादला जात असल्याचे ट्रकचालक अनीस अब्बासने सांगितले. प्रत्येकाकडून दोन हजार रुपये घेण्यात आल्याचे ट्रकमधील एकाने सांगितले.

 मानवतेची सेवा करणा-या वटवृक्षाला जागतिक आरोग्य संघटनेचा सलाम, 2020 परिचारिका वर्ष घोषित


अनेकांच्या झिजल्या चपला, पायाला जखम


गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले परप्रांतीय मिळेल त्या वाहनाने नागपूरपर्यंत आले. यातील अनेकांच्या चप्पल तुटल्या होत्या. काही अंतर पायी चालत आलेल्यांच्या पायाला जखम दिसून आली. त्यांच्या जखमेवर टोल नाका सांभाळणाऱ्या ओरिएंटल कंपनीचे कर्मचारी फुंकर घालत आहे. त्यांना चपला उपलब्ध करून देत आहेत.