यवतमाळकरांनी पाहिली हिरवाणीच्या फिरकीची कमाल

नरेंद्र हिरवाणी व हेमंत वसू
नरेंद्र हिरवाणी व हेमंत वसू

नागपूर : व्हीसीएला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू देणाऱ्या यवतमाळमध्येही नव्वदच्या दशकात दोन रणजी सामने खेळल्या गेले. मात्र, त्यातील 1989 मध्ये विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात झालेला सामना यवतमाळकर क्रिकेटप्रेमी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. अत्यंत रोमांचक ठरलेल्या त्या लढतीत वर्चस्वासाठी उभय संघांमध्ये अक्षरशः होड लागली होती.

मध्य प्रदेशने पहिल्या डावात निसटती बाजी मारत विदर्भाच्या मेहनतीवर पाणी फेरले. विदर्भ संघाने प्रयत्न केल्यानंतरही सामना अनिर्णीत झाल्याने मैदानावर उपस्थित विदर्भाचे असंख्य चाहते दुःखी व निराश झाले. पण, युवा नरेंद्र हिरवाणीच्या जादुई फिरकीने त्यांच्या मनावर कायमचे स्थान मिळविले. 1 ते 3 डिसेंबरदरम्यान पोस्टल ग्राउंडवर खेळला गेलेला तीनदिवसीय सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला होता. या सामन्याच्या निमित्ताने यवतमाळकरांना हिरवाणी, प्रशांत वैद्य, राजेश चौहान व टी. ए. शेखरसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ जवळून पाहायला मिळाला होता. मध्य प्रदेश संघात हिरवाणी, चौहानशिवाय कर्णधार अमिताभ विजयवर्गीय, टी. ए. शेखर, प्रशांत द्विवेदी, राजेश तलवार, देवाशीष निलोसे, सुनील लाहोरेसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते, तर हेमंत वसू यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघात अनिरुद्ध काणे, प्रकाश सहस्त्रबुद्धे, सुहास फडकर, समीर गुजर, भरत ठाकरे, प्रशांत वैद्य, प्रवीण हिंगणीकर, राजेश गावंडे, प्रीतम गंधे, मनोज गोगटे अशा दर्जेदार फलंदाज व गोलंदाजांची भक्कम फौज होती.

"मॅटिन विकेट' पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाने सुरुवातीच्या धक्‍क्‍यानंतर स्वतःला सावरत फलकावर 248 अशी बऱ्यापैकी धावसंख्या लावली. फडकर (48), सलामीवीर काणे (42), हिंगणीकर (36) व वसू (30) यांनी भरीव योगदान देत विदर्भाला अडीचशेजवळ पोहोचविले. लेगस्पिनर हिरवाणीने 76 धावांत सर्वाधिक सहा बळी टिपले. या धावा कमी वाटत असल्या तरी पुरेशा नक्कीच होत्या. गरज होती अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्याची. वैदर्भी गोलंदाज त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वीदेखील ठरले. त्यांनी मध्य प्रदेशचे नियमित अंतराने गडी बाद करत सामन्यातील रंगत वाढविली. पहिल्या डावात कोण आघाडी घेतो, याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र, नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या राजेश चौहान यांनी आणीबाणीच्या क्षणी महत्त्वपूर्ण नाबाद 15 धावा काढून मध्य प्रदेशला दहा धावांची आघाडी मिळवून दिली. सलामीवीर विजयवर्गीय यांनी सर्वाधिक 53, द्विवेदी यांनी 49 व मुकेश सहानी यांनी 41 धावा करून मध्य प्रदेशला 258 धावांपर्यंत पोहोचविले.

शेवटचा प्रयत्नही चुकला
संधी असूनही आघाडी घेऊ न शकल्याचे दुःख मनात ठेवून दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाने 7 बाद 262 धावांवर डाव घोषित करून सामना निकाली काढण्याचा शेवटचा प्रयत्न केला. दुर्दैवाने पुरेशा वेळेअभावी त्यांचे मनसुबे पूर्णत्वास जाऊ शकले नाही. सामना अनिर्णीत संपला त्यावेळी मध्य प्रदेशच्या 2 बाद 104 धावा फळ्यावर लागल्या होत्या. 21 वर्षीय हिरवाणीने दुसऱ्याही डावात पाच गडी बाद करून विदर्भाच्या खेळाडूंना कायमच्या जखमा दिल्या. सामन्याचा आनंद घेण्यासाठी शहरातून नव्हे, आजूबाजूच्या गावातूनही असंख्य क्रिकेटप्रेमी पोस्टल ग्राउंडवर आले होते. निकालाने त्यांची निराशा अवश्‍य झाली, पण हिरवाणीसारख्या "वर्ल्डक्‍लास' गोलंदाजाची जादुई फिरकी पाहिल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही होते. विदर्भाचे कर्णधार वसू यांनीसुद्धा दुःख बोलून दाखविले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com