बापरे! नागपुरात सात दिवसांत पाच रुपयांची पेट्रोल वाढ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

शनिवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर 82.59 रुपये होते, त्यात 0.59 पैशाची वाढ झाल्याने ते 83.18 रुपयांवर तर डिझेलचे दरातही प्रति लिटर 0.34 पैशाची वाढ झाल्याने ते 71.24 रुपयांवर पोहोचले आहे. 
 

 नागपूर : टाळेबंदीमध्ये सलग 83 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर इंधन कंपन्यांनी आता ग्राहकांचा खिसा हलका करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सात दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज रविवारी शहरात पेट्रोल प्रति लिटर 83.18 रुपये तर डिझेल प्रति लिटर 71.18 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या सात दिवसांत पेट्रोल 4.89 रुपयांनी तर डिझेल सरासरी 4.03 रुपये प्रति लिटरने महागले आहे. 

कोरोनाची पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन आढावा बंद केला होता. सात जूनपासून कंपन्यांनी दररोज इंधन दर आढावा घेणे सुरू केले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारल्याने इंधनाच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. तब्बल 83 दिवसांनंतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती.

सुंदर तरुणींना पुढे करून 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास युवकांना ओढायची जाळ्यात, वाचा...
 

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत टाळेबंदीमुळे रस्ते वाहतूक थंडावली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या.

शनिवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर 82.59 रुपये होते, त्यात 0.59 पैशाची वाढ झाल्याने ते 83.18 रुपयांवर तर डिझेलचे दरातही प्रति लिटर 0.34 पैशाची वाढ झाल्याने ते 71.24 रुपयांवर पोहोचले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Price Hike by Rs 5 in Nagpur