कोरोनाला हरविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

प्लाझ्मा उपचारपद्धतीनुसार राज्यातील 500 हून अधिक रुग्णांना बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा देण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला डीजीसीआयने होकार दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी 11 जून रोजी "ट्‌विट' करून दिली.

नागपूरः  कोरोना होऊन बरे झालेल्या लोकांच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन कोरोना रुग्णाच्या रक्तात सोडल्यास रुग्ण बरे होऊ शकतात का, हे पडताळून पाहण्यासाठी प्लाझ्मा उपचारपद्धतीवर संशोधन सुरू आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे प्लाझ्मा चाचणीला सुरुवात झाली आहे. प्लाझा थेरपीतून गंभीर रुग्णांचे प्राण वाचले तर ही थेरपी एक वरदान ठरेल. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या पुढाकारातून मेडिकलमध्ये अल्प काळात प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे.

बरे झालेले रुग्ण रक्तातील "प्लाझ्मा' दान करू शकतात. एका महिन्यात किमान दोनदा प्लाझ्मा दान करता येऊ शकते. यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग केल्या जात असल्याने रुग्णासाठी सुरक्षित आहे. विशेष असे की, प्लाझ्मा घेत असताना किंवा प्लाझ्मा घेतल्यानंतर अजिबात थकवा जाणवत नाही. या उपचारपद्धतीनुसार राज्यातील 500 हून अधिक रुग्णांना बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा देण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला डीजीसीआयने होकार दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी 11 जून रोजी "ट्‌विट' करून दिली.

वाचा- इतवारीत केमिकल, रंग, प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

एकूण 500 रुग्णांवर या उपचार पद्धतीतून केली जाणार आहे. जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल असणार आहे. प्लाझ्मा थेरपीबद्दल काही चांगले निष्कर्ष पुढे आले, तर कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून ही थेरपी प्रचलित होण्याची दाट शक्‍यता आहे. डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात श्‍वसनरोग विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, विकृतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय पराते यांच्यासह अनेक तज्ज्ञ काम करीत आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील 23 रुग्णालयांमधील 238 रुग्णांना सहभागी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यामध्ये 17जीएमसी आणि 5 कॉर्पोरेशन वैद्यकीय महाविद्यालये आहेत, अशी माहिती राज्य नोडल अधिकारी आणि चाचण्यांसाठी प्रशासकीय समन्वयक डॉ. मोहंमद फैजल यांनी दिली.

उपचार पद्धतीचा वापर सुरू झाल्यानंतर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत किमान 5 हजार गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतील. "क्‍यूअर टू क्रिटिकल' या संकल्पनेवर आम्ही काम करीत आहोत. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असून आतापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
डॉ. मोहमंद फैजल, राज्य नोडल अधिकारी, कोविड-19, नागपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plazma therepy granted