आता तरी खेळ सुरू करा हो ! नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव 

नरेंद्र चोरे
Wednesday, 28 October 2020

नागपूरच्या तुलनेत पुणे येथे कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. तरीही तेथील प्रशासनाने खेळाडूंच्या भावना लक्षात घेता अटींवर इनडोअर व आऊटडोअर खेळांना परवाणगी बहाल केली. नागपुरातही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. व्यापारी प्रतिष्ठाने व चित्रपटगृहानंतर जिम सुरू झालेत. खेळाडू मात्र सात महिन्यांपासून मैदानावर ताटकळत आहेत.

नागपूर  : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली. त्याच धर्तीवर मनपा प्रशासनाने निर्णय घेत नागपुरातही खेळांना हिरवी झेंडी दाखवावी, असे आर्जव क्रीडा पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'सकाळ'ने क्रीडा जगतातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, जवळपास सर्वांनीच सध्याच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर खेळ सुरू करायला हरकत नसल्याचे मत व्यक्त केले. जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दातारकर म्हणाले, नागपूरच्या तुलनेत पुणे येथे कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. तरीही तेथील प्रशासनाने खेळाडूंच्या भावना लक्षात घेता अटींवर इनडोअर व आऊटडोअर खेळांना परवाणगी बहाल केली. नागपुरातही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. व्यापारी प्रतिष्ठाने व चित्रपटगृहानंतर जिम सुरू झालेत. खेळाडू मात्र सात महिन्यांपासून मैदानावर ताटकळत आहेत. ते आपापल्या घरांमध्ये फिटनेस व हलका वर्कआउट अवश्य करीत आहेत. पण त्याला मैदानावरील सरावाची सर येत नाही. खेळाचे कौशल्य केवळ मैदानांवरच शिकविले जाते. दिवाळीनंतर क्रीडा स्पर्धा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सरावाला परवाणगी मिळणे आवश्यक आहे. किमान एलिट खेळाडूंना तरी परवाणगी गरजेची आहे. 

 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*
 

नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले म्हणाले, आम्ही परवाणगीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. क्रीडा मंत्र्यांनाही निवेदन दिले. जलतरणपटू घरी राहून कंटाळून गेले आहेत. त्यांच्या फिटनेस व सरावावर विपरित परिणाम झालेला आहे. सर्वच जणजलतरण तलावावर परतण्यास उत्सुक आहेत. त्यांची अडचण बघता शहरातील किमान एक तरी जलतरण तलाव तातडीने सुरू करावा, अशी आम्ही यानिमित्ताने मागणी करीत आहे, जेणेकरून राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळाडू हळूहळू सरावास सुरुवात करू शकतील.

 

हेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*
 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांचे यासंदर्भात थोडे वेगळे मत आहे. ते म्हणाले, सद्यस्थितीत खेळाडूंना त्रास होत आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र इतके दिवस थांबलो, आणखी एक महिना थांबायला माझ्या मते काहीच हरकत नाही. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊनच खेळांविषयी अंतिम निर्णय घेतला पाहिजे. घाईघाईने निर्णय घेतल्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोपर्यंत खेळाडूंनी घरी किंवा जवळपासच्या मैदानावर वर्कआऊट करून आपला फिटनेस कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

 संपादन : नरेश शेळके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plz. Start Sports Activities Soon! Sports Administrators Appeal to Nagpur Athorities