पोलिस इन ऍक्‍शन मोड! रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप, उठाबशांचीही शिक्षा

maharashtra police
maharashtra police

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर शासनाकडून कठोर पावले उचलली जात आहे. अनेकदा आव्हान करूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून संचारबंदी लागू करावी लागली. यानंतरही रस्त्यावर गर्दी होत असल्याने पोलिस दल मंगळवारपासून खऱ्या अर्थाने ऍक्‍शनमोडमध्ये आल्याचे चित्र आहे. हुल्लडबाज, विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी फटके हाणून परत पाठवले. काही ठिकाणी वाहनचालकांकडून उठाबशाही काढून घेण्यात आल्या. घराबाहेर न पडण्याची तंबी देऊन अनेकांना परत पाठविण्यात आले.
मंगळवारी सकाळपासून रस्त्यांवर सामान्य वर्दळ दिसून आली. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना टर्गेट करण्यात आले. व्हेरायटी चौक, पंचशील चौक, ओंकारनगर, जाटतरोडी, काचीपुरा चौक, सक्करदरा चौक, इंदोरा, लालगंज, टेलिफोन एक्‍स्चेंज चौकासह अन्य भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांना बांबूचे फटके हाणण्यात आले. काही भागात विनाकारण फिरणाऱ्यांकडून उठाबशा काढून परत घराबाहेर न पडण्याचे वदवून घेण्यात आले.
मंगळवारी सकाळपासूनच भाजी, किराणा दुकानांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली. वस्त्यांमधून चौकांपर्यंत जाणारे रस्ते सोडून बंदोबस्त लावण्यात आला होता. जवळची दुकाने सोडून इतरत्र वाहन घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांच्या चौकशीला समोरे जावे लागले. चौकाचौकात तैनात असणाऱ्या पोलिसांकडून प्रारंभी घराबाहेर पडण्याच्या कारणाविषयी विचारणा करण्यात येत होती. समर्पक उत्तर देऊ न शकणाऱ्यांना दंडुके हाणण्यात आले. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणी व महिलांचीही संख्या बरीच होती. त्यांच्याकडूनही उठाबशा काढून घेण्यात आल्या. परत रस्त्यावर येऊ नका, असे ठणकावून सांगण्यात आले. गरज पडल्यास यापेक्षाही कठोर कारवाईला समोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला. कारवाई कठोर वाटत असली तरी सामाजिक आरोग्यासाठी हा प्रकार आवश्‍यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली.

6 गुन्हे, 366 ताब्यात
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशानंतरही काही ठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू असून नागरिकही विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई राबविली. नियमभंग करणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या 366 जणांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात येत आहे. शहरातील विविध नाकाबंदीच्या ठिकाणी 387 वाहनचालकांविरुद्ध चालान कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com