जल्लोष करणे पडले महागात; भाजपच्या तीन आमदार, खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल

राजेश चरपे
Friday, 13 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयु युतीने बहुमताचा आकडा मिळवला. बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली होती. या यशानंतर शहर भाजपमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते.

नागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. जल्लोष करताना शारीरिक अंतराचे पालन न करता व विनापरवानगी जल्लोष केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तीन आमदार, एक खासदार, नगरसेवक व भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, खासदार विकास महात्मे, नगरसेवक संजय जाधव, प्रमोद चिखले, सुनील गिरटकर, संजय चावरे, प्रमोद बेले, बंटी जितेंद्र कुकडे, रामराव पाटील, दीपक कुहिटे, अ‍ॅड. संजय बालपांडे, शिवानी दाणी, अमृता येललकर, अनिता कासेकर, उशा बेले, पूजा पाटील, निकिता पराय, निरजा पाटील यांच्यासह ३० ते ४० भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयु युतीने बहुमताचा आकडा मिळवला. बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली होती. या यशानंतर शहर भाजपमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. त्यासाठी गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाजप शहर कार्यालयासमोर भाजपचे नेते बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता एकत्र आले.

या ठिकाणी आमदार, खासदार यांच्यासह इतर नेत्यांनी फटाके उडवून व गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन झाले. तसेच जल्लोष करण्यापूर्वी कार्यक्रमासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. ही बाब लक्षात येताच गणेशपेठ पोलिसांनी तीन आमदार, खासदार, नगरसेवक व इतर नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police case filed against three BJP MLAs and MPs