पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक ते आता पदवीधर मतदारसंघ; वाचा संदीप जोशींचा राजकीय प्रवास

टीम ई सकाळ
Monday, 9 November 2020

महापौर संदीप जोशी यांचे वडील दिवाकर जोशी हे देखील शिक्षक आमदार होते. त्यामुळे घरातूनच त्यांना राजकीय वारसा लाभला होता.

नागपूर - शहराचे महापौर संदीप जोशी यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते सध्या नागपूरचे महापौर असून त्यांनी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष काम केले. त्यानंतर ते २००२ साली नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यातच सलग दोनदा महापालिका स्थायी समिती सभापती असणारे ते एकमेव नगरसेवक आहेत.

महापौर संदीप जोशी यांचे वडील दिवाकर जोशी हे देखील शिक्षक आमदार होते. त्यामुळे घरातूनच त्यांना राजकीय वारसा लाभला होता. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच ते भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. त्यांनी महापालिका निवडणुकीत लक्ष्मीनगर या मतदारसंघातून २००२ साली पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि त्यांना यशही मिळाले. पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक पद त्यांच्या पदरी पडले. त्यानंतर सलग चारवेळा ते याच मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले.  गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला ते नागपूरचे महापौर म्हणून निवडून आले.  

हेही वाचा - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून

महापौर संदीप जोशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नागपूरमधील त्यांच्या मतदारसंघाच्या कामकाजाची जबाबदारी ही संदीप जोशी यांच्यावर सोपविली होती. त्यांची क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. ते कबड्डीचे खेळाडू असून बास्केटबॉल संघाचे अध्यक्ष देखील आहे. क्रीडा क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी विवेकानंद नगर येथे इंडोअर हॉल बांधून दिला. तसेच ते 'झेप' या संस्थेद्वारे अनेक सामाजिक कार्य करत असतात. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरजू रुग्णांसाठी दीनदयाळ थाळी सुरू केली. तसेच महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात देखील त्यांनीच केली. 

हेही वाचा - नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपकडून संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर

भाजपचा गड अबाधित -
नितीन गडकरी यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील एका सामान्य कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. हा भाजपचा मतदारसंघ आहे. पक्षाचा विश्वास ठेवून हा मतदारसंघ अबाधित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 
-संदीप जोशी, उमेदवार, पदवीधर मतदारसंघ

अशी होईल निवडणूक - 

  • उमेदवारी अर्ज दाखल - ५ ते १२ नोव्हेंबर 
  • छाननी - १३ नोव्हेंबर 
  • अर्ज मागे घेण्याची मुदत - १७ नोव्हेंबर 
  • मतदान - १ डिसेंबर
  • मतमोजणी - ३ डिसेंबर

संकलन आणि संपादन - भाग्यश्री राऊत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political journey of sandip joshi who is the candidate of nagpur graduation constituency elections