‘लस’ वाहून नेताना तापमान स्थिर, स्मार्ट हेल्थ केअरसाठी पोर्टेबल व्हॅक्सिन कोल्ड बॉक्स

केवल जीवनतारे 
Monday, 28 September 2020

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय,वानाडोंगरी येथील विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येतील दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान संस्था (अभिमत विद्यापीठ) आंतरवासितादरम्यान हे मॉडेल तयार केले.

नागपूर  : बदलत्या काळानुसार वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानातून प्रचंड बदल झाले. यातूनच नागपुरातील दोन युवकांनी स्मार्ट हेल्थ केअरसाठी आयओटी बेस्ड पोर्टेबल व्हॅक्सिन कोल्ड बॉक्स (पेल्टीयर मॉड्यूल) तयार केले. मोबाईलसह सर्व्हरच्या माध्यमातून तापमान स्थिर ठेवता येते. ही किमया यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या दोन युवकांनी साधली आहे. अमित संजय कुंभारे आणि अभिराम चंद्रशेखर मंगडे यांनी हे संशोधन केले आहे.

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय,वानाडोंगरी येथील विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येतील दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान संस्था (अभिमत विद्यापीठ) आंतरवासितादरम्यान हे मॉडेल तयार केले. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील अलोक नरखेडे, डॉ. प्राची पळसोडकर तसेच वैद्यकीय मार्गदर्शक, दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डॉ. शिल्पा गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली अमित कुंभारे आणि अभिराम मंगडे या विद्यार्थ्यांनी हे संशोधन पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. संदीप खेडकर आणि डीएमआयएमएसच्या रिसर्च हाउसचे डॉ. पुनीत फुलझेले यां संशोधनाचे नियोजन केले.

असे आहे संशोधन

मुलांचे लसीकरण करण्यासाठी पाऊस, पाणी, ऊन यांची तमा न बाळगता आशा सेविका माता आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी झटत असतात. ही मोहीम यशस्वी करताना आताही बर्फाद्वारे लसीचे तापमान कायम ठेवण्यात येते. याला तांत्रिक जोड देण्याचे काम कुंभारे आणि मंगडे यांनी केले आहे. लसीची साठवणूक करताना निकषानुसार तापमान कायम ठेवणे आवश्यक आहे. या प्रकल्पात काम कोल्ड बॉक्सच्या डिझायनिंगवर केंद्रित आहे. यात पॅल्टेर-आधारित थर्मोइलेक्ट्रिक चिप, कॅल्क्युलेशनद्वारे प्राप्त विशिष्ट स्ट्रक्चरल डिझाइन आणि आयओटी आधारित सोल्यूशन्सद्वारे सतत २-८ डिग्री सेल्सिअस तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या बॉक्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, याला ऊर्जा समर्थित वातावरणात विशिष्ट तापमान श्रेणीमध्ये लसीचा साठा राखण्यासाठी ऊर्जा वापराचा अंदाज आहे.

डिव्हाइसची प्रक्रिया अशी तयार केली

  • डिव्हाइसची ऊर्जा चालू आहे.
  • पेल्टीयर मॉड्यूलला बॅटरीजपासून व्होल्टेज पुरविला जातो.
  • पेल्टीयर मॉड्यूलच्या आत थर्मोइलेक्ट्रिक प्रभाव तयार केला जातो. त्याद्वारे मॉड्यूलच्या एका बाजूला शीतकरण प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला तापविण्याची क्षमता निर्माण होते.
  • कूलिंगचा दर मॉड्यूलच्या गरम बाजूपासून उष्णतेच्या उधळपट्टीवर अवलंबून आहे.
  • सिंक वापरून उष्णता नष्ट होण्याचे प्रमाण वाढविले जाते.
  • विशिष्ट तापमान श्रेणी आयओटी वापरून सेट आणि देखभाल केली जाते.
  • त्यानंतर सर्व डेटा क्लाउड सर्व्हरवर संग्रहित केला जातो.

 
वाहून नेणे, पॅकेजिंगच्या दृष्टीने सुलभ 
मोबाईल आणि सर्व्हरच्या मदतीने लसीकरणाची मोहीम ज्या परिसरात आहे, ते ठिकाण तपमानाची परिस्थिती ब्लाइंक अनुप्रयोगावर दर्शविले जाईल. परिसराचे ट्रॅकिंग करता येईल. स्वयंचलित वातावरणीय सेटिंग, तापमान स्थिरता तसेच हा बॉक्स वाहून नेणे आणि पॅकेजिंग या दृष्टीने सुलभ ठरू शकते. पेटंटसाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून अर्ज सादर केला आहे.
-अमित कुंभारे, अभिराम मंगडे, नागपूर. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: portable vaccine cold box will keep the temperature stable while carrying the vaccine