ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच विजेचा खेळखंडोबा, वाचा काय आहे प्रकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

काचुरवाही गाव रामटेक तालुक्‍यात असून, येथील लोकसंख्या चार हजार आहे. या गावाभोवताल असलेली गावे सुमारे दोन ते अडीच हजार लोकवस्तीची आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथील लाईनमनची बदली झाल्याने काचुरवाहीसह आदी गावांना महावितरण विभागाने वाऱ्यावर सोडून दिले आहे. वादळ, वारा, पाऊस नसताना तासन्‌तास वीज नसते. कधी कधी रात्ररात्र वीज बंद असते. परंतु महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क केला तर योग्य उत्तर मिळत नाही.

काचुरवाही/रामटेक (जि. नागपूर) : गेल्या तीन महिन्यांपासून छोट्या मोठ्या कारणांनी सतत महावितरण विभागाचा वीजपुरवठा खंडित होणे नित्याचेच झाले आहे. याकडे जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे गांभीर्याने लक्ष नसल्याचे दिसून येते. रोज दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागात याकडे लक्ष देण्यासाठी लाईनमनसुद्धा नाही.

काचुरवाही गाव रामटेक तालुक्‍यात असून, येथील लोकसंख्या चार हजार आहे. या गावाभोवताल असलेली गावे सुमारे दोन ते अडीच हजार लोकवस्तीची आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथील लाईनमनची बदली झाल्याने काचुरवाहीसह आदी गावांना महावितरण विभागाने वाऱ्यावर सोडून दिले आहे. वादळ, वारा, पाऊस नसताना तासन्‌तास वीज नसते. कधी कधी रात्ररात्र वीज बंद असते. परंतु महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क केला तर योग्य उत्तर मिळत नाही.

काचुरवाहीसह खोडगाव, किरणापूर, मसला, वडेगाव, चोखाला, खंडाळा, शिरपूर इत्यादी गावांत उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असल्याने सर्वांना घरासह शेतातही विजेची आवश्‍यकता असते. या लपंडावाने ग्रामीणांना संतप्त करून सोडले आहे. यामुळे काचुरवाही, खोडगाव, खंडाळा, मसला, किरणापूर, चोखाळा, वडेगाव येथील नागरिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. नितीन राऊत यांच्याकडे उर्जामंत्रीपद आहे. तेच जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. मात्र त्यांचे या प्रश्‍नाकडे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अवश्य वाचा- नदीपात्रात सुरू होते अंत्यसंस्कार, अचानक आला पाण्याचा लोंढा आणि...

आंदोलनाशिवाय पर्याय नाही
रात्री अपरात्री वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. ऊर्जामंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात हे हाल असतील तर उर्वरित महाराष्ट्राने ऊर्जामंत्र्यांकडून काय अपेक्षा करावी. आम्ही अनेकदा ही बाब उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तरी हा विषय मार्गी लागत नसेल तर आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.
राहुल किरपान, भाजयुमो. तालुकाध्यक्ष

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power supply of MSEDCL is constantly interrupted due to small reasons