हवालदार म्हणूनच व्हावे लागले असते निवृत्त, पोलिसांच्या पदोन्नतीकरिता सकाळचा लढा

अनिल कांबळे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पोलिस कर्मचाऱ्यांना हक्‍काची पदोन्नती मिळविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. अशातच "सकाळ'ने पोलिस हवालदारांचा हा प्रश्‍न उचलून धरत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. तसेच महासंचालक व गृहमंत्र्यांकडे बाजू लावून धरली होती. त्याचाच परिपाक म्हणून पोलिस हवालदारांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर : पोलिस विभागाअंतर्गत 2013 साली घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण हवालदारांना पदोन्नती देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला. 1500 हवालदारांना थेट पीएसआय बनविण्यात येणार असून सोमवारी यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जवळपास 12 हजार पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. "सकाळ'ने या प्रकरणावर वृत्तमालिका प्रकाशित केल्याने पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यात आला हे विशेष.

प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला किमान अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता यावे, या उद्‌देशाने तत्कालिन पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी खात्याअंतर्गत पीएसआय योजना आखली होती. त्यासाठी 2013 मध्ये पीएसआय पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जवळपास 18 हजार पोलिस कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी जवळपास 2800 कर्मचाऱ्यांना पीएसआय पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात पोलिस महासंचालक कार्यालय तसेच गृहमंत्रालय टाळाटाळ करीत होते. त्यामुळे काही पोलिस कर्मचाऱ्यांना हक्‍काची पदोन्नती मिळविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. अशातच "सकाळ'ने पोलिस हवालदारांचा हा प्रश्‍न उचलून धरत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. तसेच महासंचालक व गृहमंत्र्यांकडे बाजू लावून धरली होती. त्याचाच परिपाक म्हणून पोलिस हवालदारांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "सकाळ'वर सध्या राज्यभरातील पोलिस हवालदारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

महासंचालक कार्यालयातून निघाला आदेश
पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागातून 3 फेब्रुवारीला नोटिफिकेशन निघाले. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती निवड सूची जाहीर करण्यात आली आहे. नव्याने पीएसआय पदोन्नती दिल्यामुळे पोलिस खात्यात अधिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागितली असून येत्या दोन आठवड्यात पीएसआय पदावर रूजू होण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ऍडव्हॉक पदे भरणार!
यानंतर अर्हता परीक्षा पास उमेदवारांमधूनच ऍडव्हॉक पद्धतीने पदोन्नती देण्यात यावी. ही पदोन्नती महासंचालक कार्यालयामार्फत देण्यात यावी. त्यासाठी सेवाजेष्ठता पाहण्यात यावी. या आदेशाची पूर्तता डीजी कार्यालयाने तत्काळ करावी, असे आदेश तत्कालिन एडीजी संदीप बिश्‍नाई यांनी 10 ऑगस्ट 2018 ला दिले होते. त्यामुळे आता 2013 परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमधून ऍडव्हॉक पीएसआय पदावर बढती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे विभागाला अनुभवी पीएसआय मिळणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramotions in police department