pranab
pranab

प्रणवदा संघाच्या कार्यक्रमाला आल्यामुळे झाला होता वाद

नागपूर : काँग्रेसच्या मुशील वाढलेले डॉ. प्रणव मुखर्जी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे मोठाच वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. परंतु, प्रणवदांनी विरोधाला न जुमानता संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून सौम्य शब्दांत कान टोचले होते.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रणवदांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत प्रणवदांनी संघाच्या शाखेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, माजी राष्ट्रपतींना शाखेचे काम कसे चालते हे बघण्यासाठी बोलावण्याऐवजी त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्याचे ठरले. त्यांना संघाच्या विजयादशी उत्सवासाठी निमंत्रित करण्याचे ठरले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचे जेणे जमले नाही.

त्यामुळे ७ जून २०१८ रोजी झालेल्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना कोणत्याही प्रकारची कट्टरता तसेच धर्म वा असहिष्णुतेच्या भावनेवर आधारित या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास आपले देश म्हणून असलेले अस्तित्वच धोक्‍यात येईल, असा इशारा प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून दिला होता.

विविध मुद्द्यांवरील हिंसक प्रतिक्रियांमुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे भय आणि अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून संवादाचे सर्व मार्ग अनुसरून देशाला बाहेर काढले, तरच संपूर्ण समाज लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल. वैविध्य आणि सहिष्णुतेत भारताचा आत्मा दडला आहे. लोकशाहीमध्ये चर्चा होईल, काही मतांशी आपण सहमत असू, काहींशी नाही. पण, मत व्यक्त करण्याचा अधिकार आपण नाकारू शकत नाही, असेही ते म्हणाले होते.

अपेक्षांचा फुगा
मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी पत्र पाठवून या निणर्याचा फेरविचार करण्याचा सल्ला त्यांना दिला होता. प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती, असे मत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केले होते. दुसरीकडे संघाला कुणीही परके नसल्यामुळे प्रणवदांना दिलेल्या निमंत्रणावरून झालेले वाद निरर्थक असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात सांगितले.

मुखर्जींसाठी परंपरा बाजुला
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी संघाने सोहळ्यामधील परंपरा बाजुला ठेवली. संघाच्या परंपरेनुसार प्रमुख पाहुण्यांचे भाषण पहिले होते आणि शेवटी सरसंघचालकांचे. मात्र, ही परंपरा बाजूला ठेवत सरसंघचालकांनी पहिले भाषण केले. मुखर्जी यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

हेडगेवार निवासस्थानाला भेट
महाल परिसरातील शिर्के गल्लीतील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला प्रणवदांनी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी संघकार्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नोंदवहीत मुखर्जी यांनी अभिप्राय नोंदवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत, अशी नोंद त्यांनी नोंदवहीत केली होती.

संपादन -स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com